सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती; निवडणुकीतील मतांसाठी प्रकार

राज्यातल्या २ लाख ३० हजार सहकारी संस्थांपैकी ७० हजार सहकारी संस्था बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व सहकारी संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या असून ३१ मेपर्यंत त्यांच्याकडून खुलासा न आल्यास या संस्था बंद करण्यात येतील, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मीरा रोड येथे उपनिबंधक कार्यालयाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेनेकडून या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्यात आला होता.

केवळ जिल्हा सहकारी बँका आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांना मते मिळावीत यासाठीच या बोगस संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. या संस्थांना कार्यालय नाही, पदाधिकारी नाहीत अथवा वार्षिक हिशेबही नाहीत अशी परिस्थिती आहे. संपूर्ण सहकार क्षेत्रातच माजलेली ही बजबजपुरी दूर करून त्याला शिस्त लावण्याचे काम सुरू असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले. मानीव अभिहस्तांतरणात कागदपत्रांची पूर्तता करताना सहकारी गृहनिर्माण संस्था जेरीस आल्या आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिता एक महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे.

शिवसेनेचा बहिष्कार

उद्घाटन कार्यक्रमावर शिवसेनेकडून बहिष्कार टाकण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव होते. परंतु शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आमदार  तसेच  नगरसेवकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. उपनिबंधक कार्यालयासाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेने जागा दिली आहे, त्यामुळे उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्षांची नावे निमंत्रण पत्रिकेवर टाकणे आवश्यक होते.  या कार्यालयासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले असताना केवळ एका व्यक्तीलाच श्रेय देण्यात आल्याने शिवसेनेने कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.