पावसाळ्यात नाले तुंबल्याने रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी ठाणे महापालिकेने येत्या सोमवारपासून नालेसफाईचा कार्यक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे. नालेसफाईची कामे  देण्याची प्रक्रिया तातडीने उरकण्यात आली असून येत्या ३१ मेपर्यंत शहरातील सर्व नाल्यांतील गाळ व घनकचरा हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 ठाणे, कळवा तसेच मुंब्रा भागांतील सुमारे ३०६ नाल्यांची ५९ ठेकेदारांमार्फत नालेसफाईची कामे करण्यात येणार आहेत. या कामासंबंधी निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून त्यानुसार लघुत्तम दराच्या ठेकेदारांमार्फत येत्या दोन दिवसांत ही कामे सुरू होणार आहेत, अशी माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यासाठी सुमारे सहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
 ठाणे, कळवा तसेच मुंब्रा भागांतील वेगवेगळ्या नाल्यांची वर्षांतून दोनदा साफसफाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. गेल्या वर्षी मे महिन्यात नाल्यांची साफसफाई करण्यात आली. त्यानंतर डिसेंबर महिन्यात पुन्हा नाल्यांची साफसफाई झाली नव्हती. नालेसफाईची कामे करताना छायाचित्रण तसेच नाल्यातील गाळाच्या पातळीची मोजणी आदी अटी निविदेत टाकण्यात आल्या होत्या. त्यापैकी ठेकेदारांनी छायाचित्रणाची अट पूर्ण केली होती.
मात्र, उर्वरित अटी पूर्ण न केल्याने ठेकेदारांची बिले रखडवण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर ठेकेदारांनी यंदा नालेसफाईच्या कामांना हात न लावण्याचा इशारा दिला होता. या मुद्दय़ावरून लोकप्रतिनिधींनी पालिका प्रशासनाला धारेवर धरताच ही बिले चुकती करण्यात आली. परंतु, एप्रिल महिना संपत आल्यानंतरही यावर्षीच्या नालेसफाईच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. या पाश्र्वभूमीवर पालिकेने तातडीने निविदा प्रक्रिया उरकून ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. सर्व ठेकेदारांना नालेसफाईची कामे मे अखेपर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्रयस्थ संस्थेमार्फत नालेसफाईचे छायाचित्रण
नाल्यांची कामे ठेकेदारांमार्फत योग्य प्रकारे करण्यात येत आहेत का आणि ठेकेदारांनी नालेसफाईची कामे खरोखरच केली आहेत का, याचे मूल्यमापन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने यंदा स्वतंत्र छायाचित्रण करण्याचा निर्णय घेतला असून त्याकरिता एका खासगी संस्थेला छायाचित्रणाचे काम दिले आहे. या संस्थेमार्फत नालेसफाईची कामे करण्यापूर्वीची स्थिती आणि कामे पूर्ण झाल्यानंतरच्या स्थिती, अशा दोन्हीचे छायाचित्रण केले जाणार आहे. याशिवाय नालेसफाईची कामे सुरू असतानाही त्याचे चित्रीकरण केले जाणार आहे.

         नाल्यांची आकडेवारी
मुंब्रा                   ९२
कळवा               ४७
रायलादेवी         ३७
वर्तकनगर        २५
मानपाडा           २६
नौपाडा              २४
वागळे इस्टेट     २०
उथळसर         २४
कोपरी            ११
एकूण            ३०६