ठाण्याच्या महापौरांचे महापालिका प्रशासनाला आदेश

शहरातील पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचा खाडीला जोडणारा भाग अरुंद असल्याने शहरात पाणी साठण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. हे टाळण्यासाठी खाडीला जोडणारा नाल्याचा भाग रुंद करून पाणी वेगाने बाहेर निघून जाईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील खाडी किनारी जोडणाऱ्या सर्व नाल्यांचे मुख संबंधित प्राधिकरणाची मंजुरी घेऊन रुंद करण्याचे आदेश ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी दिले.

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पावसाळयापूर्वीची नाले सफाईचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सद्य:स्थितीत महापालिका कार्यक्षेत्रात एकूण ६२ नाले आहेत. हे नाले खाडीला मिळतात. ज्या ठिकाणी नाले खाडीला जोडले जातात तेथील नाल्याचे मुख अतिशय अरुंद असल्याने नाल्यातील पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे अभियांत्रिकी विभागाच्या पहाणीत स्पष्ट झाले आहे. परिणामी अतिवृष्टीच्या वेळी पाणी तुंबून आजूबाजच्या परिसरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. त्याचा खाडी किनाऱ्यावरील रहिवाशांना मोठा फटका सहन करावा लागतो. यावर्षी अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी खाडीला ज्या ठिकाणी नाले जोडले जातात तेथील नाल्याचे मुख रुंद करण्याची गरज आहे. हे लक्षात घेऊन महापौर संजय मोरे यांनी महापालिका प्रशासनास मुखाचे रुंदीकरण करण्याचे आदेश दिले आहे. त्यासाठी सर्व संबंधित प्राधिकरणाची मंजुरी घेवून ही कार्यवाही पूर्ण करावी असे त्यांनी प्रशासनाला पत्राद्वारे कळवले आहे. याविषयी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन येत्या पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे.

एकमेव पर्याय

शहरात साठणारे पाणी नाल्याच्या माध्यमातून खाडीत पोहचत असते. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी खाडीव्यतिरिक्त अन्य कोणतीही व्यवस्था नसल्याने नाल्यांचे रुदी वाढवून पाण्याचा वेगाने निचरा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. पावसाळ्यात पाण्याबरोबर अन्य कचराही वाहून जात असतो. अरुंद जागेमुळे तो अडकून पडून पाणी साठण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे हे नाले रुंद करण्याची गरज महापौरांनी व्यक्त केली आहे.