नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गास होणारा विरोध दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बुधवारी या महामार्गाच्या विरोधात शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रास्तारोको करुन विरोध दर्शविला. या प्रकल्पामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, त्यांनी आंदोलन केले. मुंबई-नाशिक महामार्गावर चक्का जाम करून हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्थानिक शेतकऱ्यांसोबत राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी सहभागी झाले होते.

शहापूर आणि आजूबाजूच्या गावातील शेकडो शेतकरी फडणवीस सरकार विरुद्ध घोषणा देत आंदोलनात सहभागी झाले. आजचे आंदोलन ही केवळ सुरुवात आहे. यापुढील पाऊल मुंबईकरांचे पाणी अडवून उचलले जाईल, असा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिला.
मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गाच्या विरोधात शहापूरमधील १० हजारहून अधिक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनकर्त्यांनी २ ते ३ तास मुंबई-नाशिक रस्ता जाम केला होता. रस्त्यावर बसून शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलनकर्त्यांनी समर्थन दिले. मुंबई ते नागपूर ७१० किलोमीटर लांबीचा महामार्ग बनविण्याचा निर्णय राज्यसरकार ने घेतला आहे. हा महामार्ग १० जिल्हे, ३३ तालुके आणि ३५० गावांमधून जाणार आहे. यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्यात जाणार आहेत. त्याचा विरोध म्हणून आज हे आंदोलन करण्यात आलं.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी समृद्धी महामार्गाचा प्रकल्प मागे घेण्यास सांगितले. जर सरकारने हा प्रकल्प मागे घेतला नाही, तर तीव्र आंदोलनाला सामोरे जाण्यास तयार रहा असा इशाराही देण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाचा विरोध करण्यासाठी शेकडो शेतकरी आज मुंबई नाशिक महामार्गावर उतरले होते. सरकारने वारंवार समजूत काढून देखील शेतकरी आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. थेट मुख्यमंत्री यांनी आमच्याशी संवाद साधावा, अशा घोषणा देत शेतकरी आंदोलन करताना दिसले.