राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची उद्विग्न प्रतिक्रिया

साधारण वर्ष, दीड वर्षांपूर्वीचा काळ. कोणतीही निवडणूक असली की एरवी सैनिकांची फौज रणांगणात उतरवत शत्रूला नामोहरम करून सोडणाऱ्या ठाण्यातील शिवसेनेने अचानक तलवार म्यान केली. घोडबंदर भागातील शिवसेना नगरसेवक लॉरेन्स डिसोझा यांचे पद रद्द झाल्याने जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देवराम भोईर यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि एरवी ठाण्यातील गल्लीबोळात आक्रमकपणे वावरणारे शिवसेनेचे मावळे ‘साहेबां’च्या आदेशानंतर मवाळ झाले. घोडबंदरची भोईर कंपनी आज ना उद्या शिवसेनेत प्रवेश करणार हे तेव्हाच पक्के झाले होते. तरीही राष्ट्रवादीच्या प्रदेश नेत्यांनी देवराम यांचे पुत्र संजय यांच्या गळ्यात महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाची माळ टाकली आणि वारंवार तक्रारी करूनही अखेपर्यंत भोईरांना आपले मानले. सोमवारी देवराम आणि संजय हे पिता-पुत्र आणि सून उषा या तिघा नगरसेवकांनी भगवा खांद्यावर घेताच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पवारसाहेबांनी आमचं ऐकलंच नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली.

पिंपरी : मावळमध्ये विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई; भाजप नेत्याचा इशारा
jayant patil praful patel
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”, पटेलांच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणाले, “त्यांना पक्षसंघटना…”
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”
Due to Shiv Senas aggressiveness Congress defeat in Mahavikas Aghadi
शिवसेनेच्या आक्रमकपणामुळे काँग्रेसची फरफट

राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते वसंत डावखरे यांना विधान परिषद निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागले तेव्हाच त्यांच्या समर्थकांमध्ये गणले जाणारे देवराम नाना आणि त्यांचे कुटुंबीय राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार याची चर्चा सुरू झाली. घोडबंदर भागातील माजीवडा, बाळकुम, ढोकाळी या परिसरांवर भोईर कुटुंबीयांचे वर्षांनुवर्षे वर्चस्व राहिले आहे. नवी मुंबईतील तुर्भे गावातील दिवंगत डी. आर. पाटील या बडय़ा नेत्याशी या कुटुंबाची सोयरीक. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा हंगाम जवळ येताच नेहमीच देवराम भोईर यांचे उमेदवारीसाठी नाव पुढे यायचे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या लाटेत ते भाजपवासी होतील, अशी चर्चाही होती. मात्र संजय केळकरांची उमेदवारी पक्की झाली आणि भोईर कुटुंब राष्ट्रवादीतच राहिले. मात्र वर्षभरापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत मागील पराभवामुळे विजनवासात गेलेले देवराम नाना पुन्हा रिंगणात उतरले आणि शिवसेनेने त्यांच्यासाठी थेट माघार घेतली , तर बिनविरोध विजयानंतर शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी भोईर यांचा शिवसेनेचे उपरणे घालून सत्कार केला.

आमचे नेते चुकलेच

हे सगळे घडत असूनही राष्ट्रवादी प्रदेश पातळीवरील नेत्यांनी देवराम यांचे पुत्र संजय यांना महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. सूरज परमार आत्महत्या प्रकरणात नाव पुढे आल्याने हणमंत जगदाळे यांचे पद काढून घेतले होते. पोटनिवडणुकीतील नाटय़ानंतर राष्ट्रवादीच्या जवळपास २२ नगरसेवकांनी शरद पवार, अजित पवार, सुनील तटकरे यांची भेट घेतली. संजय यांना पदावरून हटवा ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असे आर्जव त्यांच्यापुढे केले. एखाद्या निष्ठावंताला पद द्या, भोईरांचे काही खरे नाही, असे पत्रही या नगरसेवकांनी पवारांना लिहिले. तरीही पक्षश्रेष्ठी बधले नाहीत. दोन आठवडय़ांपूर्वी ठाण्यात खुद्द शरद पवारांचा दौरा झाला. त्या वेळी संजय भोईर यांची खास उपस्थिती होती. आमदार जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावर तेव्हाही काही नगरसेवक भोईर कंपनी शिवसेनेत जाईल, असे छातीठोकपणे सांगत होते. पण श्रेष्ठी मात्र भोईरांच्या अखंड प्रेमात होते. सोमवारी प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक ‘साहेबांनी आमचे ऐकले नाही’ याचा उच्चार पुन:पुन्हा करताना दिसत होते.