शारदा सोसायटी गरिबाचा वाडा, डोंबिवली (.)

आपले घर समुद्रकिनारी असावे आणि बाल्कनीतून किनाऱ्याकडून फेसाळत येणाऱ्या लाटा दिसाव्यात. समुद्रकिनाऱ्याच्या ताज्या खाऱ्या वाऱ्याचा गंध अवतीभोवती असावा, असे बहुतेकांचे स्वप्न असते. मुंबईतील गर्भश्रीमंत, सिने कलावंत प्रत्यक्षात अशा घरांमध्ये राहत असतात. डोंबिवलीत अशा प्रकारचे स्वप्न पाहण्यात काहीच अर्थ नाही. मात्र अगदी समुद्र नसला तरी काही डोंबिवलीकरांना खाडीकिनारी राहण्याचे सुख लाभले आहे. पश्चिम विभागातील गरिबाचा वाडा येथे अशाच काही वसाहती आहेत. साधारण दोन दशकांपूर्वी या ठिकाणी लोक राहायला आले. शारदा सोसायटी त्यापैकी एक. काँक्रीटचे जंगल अशी डोंबिवलीचीही ओळख असली तरी या परिसरात मात्र अजूनही निसर्ग सहवासाचा आनंद मिळतो.

डोंबिवली शहराच्या पूर्व भागाचा विकास झपाटय़ाने झाला. त्यामानाने पश्चिम विभाग काहीसा मागे राहिला. मात्र नव्वदच्या दशकात हे चित्र पालटू लागले. पश्चिम विभागात अनेक नव्या वसाहती उभ्या राहू लागल्या. गरिबाचा वाडा परिसरातील शारदा को.ऑप.हौसिंग सोसायटी ही त्यातीलच एक जुनी सोसायटी आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकापासून साधारण अर्धा तासाच्या अंतरावर असलेल्या या सोसायटीमध्ये ५ इमारती असून त्यात एकूण ९० सदनिका आहेत. बांधकाम व्यावसायिक जिग्नेश शहा व जयेश शहा यांनी शारदा सोसायटीची उभारणी केली. या सोसायटीचे काम १९९६ मध्ये सुरू झाले. १९९८ मध्ये पाचही इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर १९९९ मध्ये सोसायटी स्थापन झाली. सध्या गणेश साळुंखे सोसायटीचे अध्यक्ष, मनोज मांजरेकर सचिव तर नरेश नाईक खजिनदार आहेत.

पूर्वी गरिबाचा वाडा या परिसरात अष्टगंधा, सद्गुरू आणि शारदा या तीनच सोसायटय़ा उभ्या होत्या. बाकी सर्व ठिकाणी बैठी घरे, आणि चाळी होत्या. आजूबाजूच्या चाळीतील आणि काही मुंबईतील चाकरमान्यांनी त्या वेळी ३ ते ६ लाखांपर्यंत वन रूम व वन बीएचके खोल्या खरेदी करत शारदा सोसायटीत घर घेतले. आता या घरांच्या किमती ३० ते ३५ लाखांच्या घरात गेल्या आहेत. सर्व जाती-धर्माचे लोक या वसाहतीत गुण्यागोविंदाने राहतात.

स्टेशनपासून थोडे दूर अंतरावर असले तरी आजूबाजूला घनदाट झाडी झुडपे, अवघ्या काही अंतरावर दिसणारा खाडीचा किनारा यामुळे येथे राहायला आलेला प्रत्येक चाकरमानी खूश होता. निसर्गाचा हाच ठेवा त्यांनी सोसायटीच्या आवारातही जपण्याचा प्रयत्न केला आहे. या सोसायटीतील प्रत्येक व्यक्ती हरहुन्नरी असून त्यांनी स्वत: श्रमदान करून सोसायटीचा परिसर सुशोभित केला आहे. याचे प्रथम दर्शन सोसायटीत प्रवेश केल्या केल्याच घडते. सोसायटीच्या आवारात विकासकाने गणेशाचे सुबक आखीव रेखीव असे मंदिर उभारून दिले आहे. त्या मंदिराच्या बाजूलाच झाडाझुडपांनी बहरलेला एक छोटेखानी बगिचा आहे. या बगिच्यामध्ये सोसायटीतील रहिवाशांनी एक रेखीव कारंजे केले आहे. त्यासाठी लागणारे दगडही त्यांनी विविध ठिकाणांहून शोधून आणून स्वत शिल्प तयार केले आहे. या कारंज्याच्यावर पारिजातकाचे झाड असल्याने त्याच्या पाण्यात पारिजातकाच्या फुलांचा सडा पाहायला मिळतो. खळखळणारा पाण्याचा लहानसा झरा, त्यावर फुलांचा सडा पाहून मन प्रसन्न होते, तर सोसायटीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला हे कारंजे पाहून उल्हसित वाटले नाही तर नवलच.

पर्यावरणाचे रक्षण करण्याबाबत सोसायटीतील प्रत्येक व्यक्ती सतर्क आहे. सीमेंट काँक्रीटच्या इमारतींमध्ये गारवा टिकून राहावा म्हणून सोसायटीच्या वतीने इमारतींच्या आजूबाजूला बदाम, जांभूळ, चिकू, पेरू, नारळ, पपई, सीताफळ, पारिजातक, जास्वंद, गुलाब, सदाफुली अशी अनेक फुलं व फळझाडांची लागवड मोठय़ा प्रमाणात केली आहे. या झाडांची काळजी घेणे, त्यांना पाणी देणे, वरचेवर त्यांची छाटणी, खत घालणे आदी सर्व कामे सोसायटीतील नागरिक करतात. तसेच लहान मुलेही त्यांना हातभार लावत असून पर्यावरणाचे रक्षण करणे का गरजेचे आहे, याविषयीचे संस्कार त्यांच्या मनावर लहानपणापासूनच बिंबविले जात असल्याचे सोसायटीचे सचिव अ‍ॅड. मनोज मांजरेकर यांनी सांगितले. या झाडाझुडपांमुळे आवारात नेहमी गारवा जाणवतो. उन्हाळ्याच्या दिवसांतही झाडांमुळे फारशी उन्हाची दाहकता जाणवत नाही.

पार्किंग आणि मैदानाचा अभाव

सोसायटीला वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ नाही. त्यामुळे रहिवाशांना इमारतीबाहेरच वाहने उभी केली जात आहेत. काही सोसायटय़ांनी वाहने उभी करण्यासाठी आवारातील झाडे तोडली आहेत, परंतू सोसायटीतील सर्व रहिवाशांचा झाडे तोडण्यास विरोध आहे. वाहने उभी करण्यासाठी झाडांची कत्तल करायची नाही असेच सर्वाचे ठाम मत आहे. आजूबाजूला मुलांना खेळण्यासाठी आता एकही मैदान शिल्लक राहिलेले नाही. पूर्वी मोकळ्या मैदानात ओसाड रानावर मुले खेळण्यासाठी जात असत. आता सोसायटीच्या आवारातील मोकळ्या जागेतच त्यांना खेळावे लागते.

अरुंद रस्त्यांमुळे हाल

परिसरातील रस्ते खूप अरुंद आहेत. त्यामुळे येथे कायम वाहतूक कोंडी होते. त्यामुळे नोकरदारांचे खूप हाल होतात. विशेषत: सकाळी. कारण रिक्षा मिळून स्टेशन गाठेपर्यंत अर्धा अर्धा तास लागतो. त्यामुळे अनेकदा नेहमीची गाडी चुकते.

रिंगरुट होणार असल्याने सोसायटीची काही जागा ही रस्ता रुंदीकरणात गेली आहे. गेली दहा वर्षे नागरिक रिंगरूट होणार, त्यामुळे भिवंडी, ठाणे हा परिसर जवळ येणार असल्याचे ऐकत आहेत. मात्र आता कुठे या कामाला हिरवा कंदील मिळाला असून काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.

कचऱ्याचे ढीग

स्थानक परिसरातून हा परिसर थोडय़ा दूर अंतरावर असल्याने स्वच्छतेचे कायम तीनतेरा वाजलेले दिसतात. रस्त्यावरील कचराकुंडय़ा या भरून वाहात असतात. भटकी कुत्री तो कचरा इतरत्र पसरवितात. यामुळे रस्त्यावर कायम दरुगधीचे साम्राज्य असते. आधीच अरुंद रस्ता, त्यात फेरीवाल्यांनी तो गिळंकृत केला असल्याने नागरिकांनी चालायचे कोठून हा प्रश्न पडतो.

प्राथमिक आरोग्य केंद्र नाही

परिसरात कल्याण-डोंबिवली महापालिकेचे एकही प्राथमिक आरोग्य केंद्र नाही, नागरिकांना तासाभराच्या अंतरावर असलेले शास्त्रीनगर हॉस्पिटल गाठावे लागते, किंवा स्टेशन परिसरातील खाजगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागतो. परिसरात एकही मोठा दवाखाना नाही.

परिवहनची पाठ, विजेचा खेळखंडोबा

जवळपास खाजगी शाळा नसल्याने मुलांना दूरवर जावे लागते. सोसायटीतील मुले ही पूर्वेला असलेल्या खाजगी शाळांमध्ये शिकत असून त्यांना नेण्यासाठी बसेसची सुविधा उपलब्ध आहे. या परिसरात वाहतुकीसाठी रिक्षावर अवलंबून राहावे लागते. केडीएमटीची बस सुविधा नाही. दोन टाकी परिसरात केडीएमटीची बस येते, परंतु आत येत नाही. त्यामुळे नागरिकांना रिक्षा चालकांवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे रिक्षा चालकांचे फावले आहे. रात्रीच्या वेळेस ते मनमानी भाडे आकारतात, स्वतंत्र रिक्षा तर या भागात येतच नाहीत. या परिसरातील वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने होतो. कारण लोकसंख्येच्या प्रमाणात ट्रान्सफार्मर नाहीत.

अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट

परिसरात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहे, यामुळे खाडीचा परिसर तर पूर्ण झाकला गेला आहे. काही ठिकाणी खाडीवर भराव टाकून चाळी उभारल्या जात आहेत, त्यामुळे पावसाळ्यात कायम या परिसरात पाणी साचण्याची समस्या उद्भवते. अरुंद रस्ते, त्याखालून गेलेल्या जलवाहिन्या वारंवार नादुरुस्त होतात. त्यामुळे सोसायटीच्या समोरील रस्त्यावर महिन्यातून पाच ते सहा वेळा तरी पाणी साचतेच साचते. या समस्यांविषयी सातत्याने लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यात आला आहे, मात्र तरीही हे प्रश्न काही सुटलेले नाहीत.

उत्सवांनिमित्त स्पर्धा

दरवर्षी सोसायटीच्या वतीने दहीहंडी, माघी गणेशोत्सव, नवरात्र, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आदी सण आणि उत्सव साजरे केले जातात. माघी गणेशोत्सवादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मुलांसाठी शैक्षणिक, बौद्धिक, शारीरिक स्पर्धाचे आयोजन केले जाते. या स्पर्धाच्या पारितोषिक वितरणासाठी शहरातील मोठमोठे साहित्यिक, कवी, कलाकार आदी लोकांना पाचारण केले जाते. त्यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक भान जपले जाते, तसेच लोकांना साहित्याचे, विविध विषयांचे मार्गदर्शनही मिळते. यंदा प्रथमच सोसायटीतील रहिवाशांची अलिबाग येथे सहल आयोजित करण्यात आली होती, असेही मांजरेकर यांनी सांगितले.

सण उत्सवासाठी लागणारे सर्व साहित्य, मंडपाचे साहित्य सोसायटीने स्वखर्चाने खरेदी केले असल्याने दरवर्षी यावर होणारा खर्च वाचतो, या निधीचा उपयोग इतरत्र करता येतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने सोसायटीमध्ये एका सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकासाठी एक खोलीही सोसायटीतील रहिवाशांनीच श्रमदानातून बांधली आहे. सुरक्षिततेबरोबरच रहिवाशांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाते. पावसाळ्याच्या अगोदर सोसायटीचे आवार, टेरेस स्वच्छ केले जाते. सध्या सर्वत्र डेंग्यूची साथ असल्याने पालिकेच्या वतीने सोसायटीमध्ये औषध फवारणी करून घेतली आहे. इतर वेळेसही सोसायटीच्या आवाराची स्वच्छता करण्यासाठी सगळेच मदत करतात, असे सदस्य दिनेश चव्हाण यांनी सांगितले.