ठाणे परिवहन उपक्रमाची बससेवा आणि मीटर रिक्षांच्या प्रवासी भाडय़ात वाढ झालेली असतानाच आता शहरातील काही मार्गावरील शेअर रिक्षाप्रवासही महाग झाला आहे. वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगर या मार्गावरील शेअर रिक्षांच्या भाडय़ात अचानक तीन रुपये वाढ करण्यात आली असून, या अघोषित वाढीमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
ठाणे परिवहन उपक्रम सेवेच्या बस तिकीट दरात आणि शहरातील मीटर रिक्षांच्या दरात नुकतीच भाडेवाढ करण्यात आली असून, यामुळे ठाणेकरांना आता प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. असे असतानाच वागळे ते ठाणे स्थानक तसेच लोकमान्य ते ठाणे स्थानक या दोन्ही मार्गावर धावणाऱ्या शेअर रिक्षाचालकांनीही भाडेवाढ केली आहे. काही दिवसांपूर्वी लोकमान्यनगर ते ठाणे रेल्वे स्थानक या मार्गावर शेअर रिक्षांचे प्रवासी भाडे १५ रुपये इतके होते. मात्र या मार्गासाठी आता १८ रुपये भाडे आकारण्यात येत आहे. प्रवाशांनी या भाडेवाढीचे कारण विचारले तर बस आणि मीटर रिक्षांच्या भाडेवाढीचे कारण शेअर रिक्षाचालक पुढे करतात. मात्र या भाडेवाढीस ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने कोणतीही मान्यता दिलेली नाही. त्यामुळे शेअर रिक्षांच्या अघोषित भाडेवाढीने प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत असून, अशा रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून होऊ लागली आहे. वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगर विभागातील शेअर रिक्षाचालकांनी अघोषित भाडेवाढ करून प्रवाशांना अक्षरश: वेठीस धरल्याचे चित्र दिसून येते. दरम्यान, यासंदर्भात ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांच्याशी संपर्क साधला असता, शेअर रिक्षांच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेअर रिक्षाचालकांकडून जास्त भाडे घेण्यात येत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

खासगी वाहनांचा प्रवासही महाग
ठाणे : ठाणे पूर्व स्थानक ते वागळे इस्टेट (रामनगर) या मार्गावर धावणाऱ्या खासगी वाहनांचा प्रवास सुखकर वाटत असतानाच या प्रवासी भाडय़ात ५० टक्के वाढ केल्याने प्रवाशांना आता पाच रुपये जास्त मोजावे लागत आहेत. अचानकपणे भाडेवाढ लागू करण्यात आल्याने प्रवाशांनी या खासगी वाहनांकडे पाठ फिरवली आहे.
ठाणे पूर्व स्थानक ते वागळे इस्टेट (रामनगर) या मार्गावर सुमो, जीप अशी खासगी वाहने प्रवासी वाहतूक करतात. या वाहनांच्या शेअर रिक्षांप्रमाणे सातत्याने फेऱ्या सुरू असतात. त्यामुळे ठाणेकर प्रवाशांना तत्काळ सुविधा मिळत असून, त्यासाठी अवघे दहा रुपये मोजावे लागतात.
मात्र, आता या वाहनचालकांनी ५० टक्के भाडेवाढ करून प्रवाशांना धक्का दिला आहे. त्यामुळे ठाणेकरांना आता पाच रुपये जास्त मोजावे लागत आहेत. टीएमटीच्या तिकीट दरात भाडेवाढ करण्यात आल्यामुळे ही भाडेवाढ करण्यात आल्याचे कारण बसचालकांकडून सांगण्यात येते, अशी माहिती प्रवाशांनी दिली.