वाढत्या महागाईच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने सोमवारी पुकारण्यात आलेल्या महामोर्चात शिवसैनिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले. ऐन गर्दीच्या वेळेत राममारुती मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मोर्चा काढण्यात आल्यामुळे काही भागांत वाहतूक कोंडी झाली.

महागाईविरोधातील घोषणाफलक घेऊन शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. ‘सामान्य माणूस झाला दीन, कुठे गेले अच्छे दिन’ अशा आशयाचे फलक घेऊन महिला मोर्चात सहभागी झाल्या. महाविद्यालयीन तरुणांनी महागाईविरोधातील पथनाटय़ सादर केले.पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, महापौर मीनाक्षी शिंदे हे सहभागी झाले. सकाळी राममारुती रस्त्याजवळील शिवसेनेच्या शाखेपासून सुरू झालेला मोर्चा दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ संपला. या मोर्चासाठी तलावपाळी, राममारुती रस्ता या ठिकाणची वाहतूक व्यवस्था बदलण्यात आल्याने काही काळ नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. तलावपाळीच्या दिशेने राममारुती रस्त्यावर येणारी वाहतूक मोर्चासाठी पूर्णत: बंद ठेवण्यात आली असल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त जात होता. तलावपाळीकडून राममारुती रस्त्याकडे जाण्यासाठी गजानन मठाच्या चौकाच्या दिशेने घंटाळी रस्त्यावरून वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागल्याने घंटाळी चौक, तीन पेट्रोल पंप अशा शहरातील अंतर्गत रस्त्यांवरदेखील वाहतूक कोंडी झाली होती.

एकनाथ शिंदे यांचा सावध पवित्रा

ठाण्यात शिवसेनेतर्फे हाती घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाचे नेतृत्व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असते हे यापूर्वीही दिसून आले आहे. सोमवारी काढण्यात आलेल्या मोर्चातही पालकमंत्री शिंदे सहभागी झाले खरे, मात्र सरकारमधील एक मंत्री असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी निघालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश नव्हता. मोर्चाला सामोरे जाताना शिंदे यांनी उद्धवसाहेबांचा आदेश आला तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, अशी गर्जना केली खरी, पण प्रत्यक्षात मोर्चातील बॅनरवर त्यांचे छायाचित्र नसल्याने याची कुजबुज शिवसैनिकांमध्ये सुरू होती.

टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवाकडे मुख्यमंत्र्यांची पाठ

या मोर्चाच्या निमित्ताने शिवसैनिक एकीकडे सरकारविरोधात रस्त्यावरची लढाई लढत असताना पक्षाचे विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांच्या नवरात्रोत्सवास खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या भेटीची चर्चाही होती. मुख्यमंत्री ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसेनेच्या नवरात्रोत्सवाकडे फिरकले देखील नाहीत. मात्र रवींद्र फाटक यांच्याकडे मात्र आवर्जून उपस्थित राहिले. यावरून शिवसैनिकांमध्ये उलटसुलट चर्चा होती.