स्थानिक नेत्यांना बदल मान्य नसल्याने प्रस्ताव मागे पडण्याची चिन्हे
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने अंबरनाथ आणि बदलापूर या दोन नगरपालिकांचे एकत्रीकरण करून स्वतंत्र महापालिका तयार करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करताच या भागातील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपने प्रस्तावित महापालिकेच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे. या दोन्ही नगरपालिकांमध्ये सध्या शिवसेनेची एकहाती सत्ता असली तरी बदलापुरात वर्षांनुवर्षे भाजपची ताकद राहिली आहे. मुंबई महानगर प्रदेशात पनवेल आणि अंबरनाथ-बदलापूर महापालिकेचे वारे वाहू लागले असताना राज्यातील सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेना-भाजपच्या स्थानिक नेत्यांना हे नवे बदल मान्य नसल्याने एकत्रित महापालिकेचा प्रस्ताव मागे पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दोन्ही नगरपालिकांची एकत्रित महापालिका नसावी यासाठी या दोन्ही शहरांमधील शिवसेना-भाजपचे नेते ही महानगरपालिका तांत्रिकदृष्टय़ा अयोग्य असल्याचे दाखले देत फिरताना दिसत आहेत.
बदलापूरकरांमधील काही राजकीय नेते हा विरोध करताना अंबरनाथमुळे बदलापूरच्या सांस्कृतिक वातावरणाचे खच्चीकरण होईल अशी भीती व्यक्त करत असून अद्याप मोठय़ा घोटाळ्यांची हवा न लागलेल्या अंबरनाथला बदलापूरमुळे आपली नगरपालिका घोटाळ्यांच्या गर्तेत ओढली जाईल अशी भीती यासाठी व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे, नगरपालिका निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकलेले शिवसेना-भाजपचे नेते महापालिका नको या मागणीसाठी मात्र एकमेकांच्या सुरात सूर मिसळताना दिसू लागले आहेत. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या यासंबंधीच्या प्रस्तावानंतर बदलापूरमधील भाजप नेत्यांनी महापालिका नको यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे, तर शिवसेनेनेही त्यास विरोध केला आहे. या दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचा निर्णय झाल्यास नवी राजकीय व्यवस्था उभी करावी लागेल.

लोकप्रतिनिधींची कारणमीमांसा
अंबरनाथ व बदलापूर नगरपालिकांच्या आस्थापना खर्चात तफावत असून या दोन्ही नगरपालिकांचा प्रशासकीय खर्च एकत्र केल्यास त्याचा शहरी विकासकामांसाठी खर्च करण्याच्या निधीवर परिणाम होऊ शकतो.

खरा विरोध शहरी व्यक्तिमत्त्वांनाच
बदलापूरच्या सांस्कृतिक पाश्र्वभूमीमुळे बदलापूर हे दुसरे डोंबिवली म्हणून ओळखले जाते. अंबरनाथचा चेहरा फारसा सांस्कृतिक नाही, अशी ओरड सातत्याने होत असते. त्यामुळे या दोन्ही शहरांची एकत्रित महापालिका झाल्यास विकासकामांवर सकारात्मक परिणाम दिसणार नाही, असा दावा केला जात आहे. गेल्या पाच वर्षांत बदलापुरात बीएसयूपी, टीडीआर घोटाळे झाले आहेत. यामुळे बदलापुरातील राजकीय गुन्हेगारीने अंबरनाथपेक्षाही कळस गाठला आहे. त्यामुळे एकत्रित महापालिकेला युतीचा विरोध आहे.

तीव्र आंदोलनाचा इशारा
अंबरनाथ-बदलापूर महानगरपालिका करण्याआधी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नागरिकांना विश्वासात घेतले नाही तर शहर भाजप या प्रस्तावाविरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा भाजप गटनेते व प्रवक्ते राजेंद्र घोरपडे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. दरम्यान, अंबरनाथ शहराची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक झाली असून, त्यामुळे अंबरनाथची स्वतंत्र महानगरपालिका होऊ शकते. त्यामुळे अंबरनाथला बदलापूरसोबत जोडण्याची आवश्यकता नाही, अशी भूमिका शिवसेनेचे अंबरनाथमधील आमदार बालाजी किणीकर यांनी स्पष्ट केली आहे.