गेल्या तीन वर्षांपासून राजकीय वाद आणि न्यायालयीन फेऱ्यांत अडकलेल्या ठाणे महापालिकेतील स्वीकृत सदस्य आणि पाच विशेष समित्यांवर सदस्यांची मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेमुळे महापालिकेतील राजकीय आसने पूर्णपणे भरली गेली आहेत. तसेच या सभेमध्ये महापालिकेची आर्थिक नाडी असणाऱ्या स्थायी समितीमधील आठ निवृत्त सदस्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त सदस्य संख्याबळानुसार स्थायी समिती आणि विशेष समित्यांमध्ये सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीचे वर्चस्व राहणार असल्याचे उघड झाले आहे.
ठाणे महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधरण सभेमध्ये पाच स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचा एक अशा पाच सदस्यांचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक राम रेपाळे आणि विकास रेपाळे या दोघांना शिवसेनेच्या कोटय़ातून स्वीकृत सदस्य पद देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोटय़ातून कळवा-मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे पट्टशिष्य व विद्यमान ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान तसेच रिपाइं एकतावादीचे नागसेन इंदिसे या दोघांना स्वीकृत सदस्य पद देण्यात आले. तसेच काँग्रेसच्या कोटय़ातून प्रदीप राव यांची स्वीकृत सदस्यपदी वर्णी लागली आहे.
महापालिकेची आर्थिक नाडी असणाऱ्या स्थायी समितीमधून अशोक वैती, गिरीश राजे, संजय मोरे, नारायण पवार, संजय भोईर, नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे, सुधाकर चव्हाण हे निवृत्त झाले. त्यांच्या जागी शिवसेनेचे मधुकर पावशे, एकता भोईर, अनिता बिर्जे, बालाजी काकडे, राष्ट्रवादीचेयोगेश जानकर, नजीब मुल्ला, काँग्रेसचे मनोज शिंदे, मनसेच्या राजेश्री नाईक यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर पाच विशेष विशेष समित्यांवर प्रत्येकी नऊ सदस्यांची निवड करण्यात आली. महापालिकेचे शिक्षण बरखास्त झाल्यामुळे पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक या सर्व विभागांचे एकत्रीकरण करून नवी शिक्षण समिती स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असून समितीमध्ये शिवसेनेचे नरेश मणेरा, मंदार विचारे, अनिता गौरी, विहंग सरनाईक, राष्ट्रवादीचे सुहास देसाई, भरत चव्हाण, काँग्रेसच्या मेघना हंडोरे, भाजपचे मिलिंद पाटणकर आणि मनसेच्या रत्नप्रभा पाटील यांची निवड करण्यात आली.