आमदार कथोरे खोटे बोलत असल्याचा शिवसेनेचा आरोप; उपनगराध्यक्षपदाचे आश्वासनच दिले नसल्याचा खुलासा

कुळगाव-बदलापूर नगरपालिका निवडणुकीत भाजपला धूळ चारत सत्ता प्रस्थापित करणाऱ्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी उपनगराध्यक्ष पदावरून पुन्हा एकदा भाजपवर पलटवार करण्यास सुरुवात केली असून भाजपचे आमदार किसन कथोरे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन चक्क खोटे बोलतात, असा आरोप नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी केला आहे. इतकी वर्षे आमदार असलेल्या कथोरे यांनी शहराच्या विकासासाठी काय केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Sunetra pawar, Ajit Pawar,
अजित पवारांनी सपत्निक घेतले दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन; सुनेत्रा यांनी देवाला केली ‘ही’ प्रार्थना
Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा; म्हणाले, “नकली शिवसेना म्हणायला ती तुमची डिग्री आहे का?”
Narendra Modi criticism that Shiv Sena is fake with Congress
काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा
UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप

नगरपालिकेच्या कारभाराविषयी आमदार कथोरे सातत्याने टीका करत आहेत. कथोरे यांचे आरोप चुकीच्या माहिती आधारे असून उपनगराध्यक्षपदाविषयी पालकमंत्र्यांनी भाजपला कोणताही शब्द दिला नव्हता, अशी टीका म्हात्रे यांनी केली आहे. विधान परिषद निवडणुकीपूर्वी भाजपची मदत मिळावी यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरपालिकेतील सत्तेत सामावून घेण्याविषयी शब्द दिला होता, असे वक्तव्य मध्यंतरी आमदार कथोरे यांनी केले होते. त्यामुळे पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळायला हवा, असे मत कथोरे यांनी व्यक्त केले होते. त्यावर बोलताना नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी कथोरे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवीत असा कोणताही शब्द दिला नव्हता, अशी भूमिका मांडली आहे.

पालिकेत शिवसेना एकटी

दरम्यान, पालिकेतील उपनगराध्यक्ष पदावरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद सर्वसाधारण सभेतही उमटू लागले आहेत. भाजपने नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार घातला. त्यामुळे पालिका सभागृहात शिवसेनेचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आशीष दामलेच उपस्थित होते. मात्र आर्थिक विषयांना वगळून इतर विषयांवर चर्चा व्हावी, अशी आग्रही मागणी दामले यांनी रेटल्याने सर्व आर्थिक विषय सभागृहात पुढे ढकलण्यात आले.

कथोरेंवर बोचरी टीका

* भाजपचे स्थानिक पदाधिकारी आमच्याकडे प्रस्ताव घेऊ न आले होते. पालकमंत्र्यांनी कोणताही शब्द दिला नसून आमदार कथोरे खोटी माहिती देत असल्याचा आरोप वामन म्हात्रे यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार पालिकेच्या कामात ढवळाढवळ करत असून काही प्रकरणांची चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.

*  आमदारांच्या बेछूट आरोपांमुळे नगरपालिकेची विकासकामे रखडत असून त्यांनी पालिकेच्या कामात ढवळाढवळ करू नये. श्रेयासाठी आमदारांची धडपड असल्याची टीका केली.

* गेली अनेक वर्षे किसन कथोरे आमदार आहेत. अनेक वर्षे बदलापूर पालिकेतही भाजपचाच नगराध्यक्ष होता. असे असताना शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित का आहेत, असा सवालही त्यांनी केला. नगरपालिका मुख्यालय तसेच नाटय़गृहासारखा साधा प्रश्न कथोरे यांना सोडविता आला नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम कुणामुळे रखडले, असा सवालही त्यांनी केला.

* पालिका क्षेत्रात नियोजनबद्ध विकासकामे करण्याची गरज असताना आपल्या नगरसेवकांच्या प्रभागात एमएमआरडीएसारख्या संस्थेच्या माध्यमातून निधी मिळवून पालिकेच्या कामातही आडकाठी घालण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

* पालिकेत सत्तेत वाटा मिळवायचा आणि दुसरीकडे पालिकेच्या कारभारात ढवळाढवळ करून तक्रारी करायच्या ही दुटप्पी भूमिका असून पालिकेत सत्तेत सहभागी होण्याआधी भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान त्यांनी कथोरे यांना दिले.