दुकानांसमोरील मोकळी जागा संपादित करण्यास शिवसेना-भाजपचा विरोध

वर्तकनगर, कळवा तसेच मुंब्रा या परिसरांतील रस्त्यांचे रुंदीकरण करून वाहतुकीला मोकळी वाट करून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या प्रत्यक्ष ठाण्यातील रस्ता रुंदीकरणाला राजकारण्यांनी खो घातला आहे. गोखले रोड, राममारुती रोड, शिवाजी पथ, खोपट आणि लालबहादूर शास्त्री मार्ग या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी या रस्त्यांलगतच्या इमारतींसमोरील मोकळी जागा (मार्जिनल स्पेस) संपादित करण्याबाबतचा प्रशासनाचा ठराव बुधवारी सत्ताधारी शिवसेना-भाजपने बहुमताच्या जोरावर फेटाळून लावला. पालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी ताब्यात घेतलेली जागा आणि या रस्त्यांवर फेरीवाल्यांकडून होत असलेले अतिक्रमण यांमुळे वैतागलेल्या व्यापारीवर्गाचा आणखी रोष होऊ नये, यासाठी सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव हाणून पाडला. मात्र, त्यामुळे ठाण्यातील प्रमुख रस्त्यांच्या रुंद होण्याचा मार्ग खुंटला आहे. विशेष म्हणजे, प्रस्तावित रस्त्यांपैकी अनेक रस्त्यांच्या रुंदीकरण तसेच अन्य कामांचे कंत्राट आधीच काढण्यात आले असल्याने या मुद्दय़ावरून प्रशासन चांगलेच अडचणीत सापडले आहे.

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आठ महिन्यांपूर्वी शहरात रस्ते रुंदीकरण मोहीम सुरू केली. या मोहिमेत पोखरण रस्ता क्रमांक एक आणि दोनचे रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ कळवा तसेच मुंब्रा भागातील मुख्य रस्त्यांचेही रुंदीकरण करण्यात आले आहेत. या रुंदीकरण मोहिमेत अनेक बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे. पावसाळ्यात रुंदीकरणाची कामे शक्य नसल्यामुळे या मोहिमेत काहीसा खंड पडला होता. मात्र, पाऊस संपत आल्याने आयुक्त जयस्वाल यांनी गोखले रोड, राममारुती रोड, शिवाजी पथ, खोपट आणि लालबहादूर शास्त्री मार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील हे सर्व रस्ते असून त्या ठिकाणी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा आकडा मोठा आहे. या पाश्र्वभूमीवर आयुक्त जयस्वाल यांनी या पाचही रस्त्यांच्या रुंदीकरणाची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी सादर केला होता; परंतु आमच्या मतदारसंघातील व्यापाऱ्यांसोबत आधी चर्चा करू द्या, मगच हे प्रस्ताव मंजूर करू, असा पवित्रा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विलास सामंत यांनी घेतला. त्यास भाजपचे सभापती संजय वाघुले यांनीही तात्काळ मान्यता दिली. त्यामुळे गेल्या स्थायी समितीच्या सभेत हे प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला होता. दरम्यान, बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने हे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले होते. त्यास सत्ताधारी शिवसेना-भाजपने विरोध केला तर काँग्रेसने पाठिंबा दिला. त्यामुळे या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये सत्ताधारी शिवसेनेने आठ विरुद्ध एक अशा मताने हे प्रस्ताव नामंजूर केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे यांनीच मंजुरीच्या बाजूने मतदान केले तर काँग्रेसचे नगरसेवक यासीन कुरेशी यांच्यासह राष्ट्रवादी आणि मनसेचे नगरसेवक मात्र तटस्थ राहिले.  दरम्यान या रस्त्यांच्या कामाकरिता स्थायी समितीमध्ये यापूर्वीच कामांच्या खर्चासाठी मंजुरी देण्यात आली असून त्याप्रमाणे निविदा प्रक्रियाही सुरू झाली आहे. त्यामुळे हे प्रस्ताव नामंजूर केले असले तरी त्या खर्चाचे काय, असा सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी उपस्थित केला आहे.

व्यापाऱ्यांची भलामण

गोखले रोड, राम मारुती रोड भागातील व्यापाऱ्यांनी यापूर्वी दोनदा रस्ते रुंदीकरणासाठी जागा दिल्या असून आता पुन्हा त्याच ठिकाणी रुंदीकरण करण्यात येत असल्याने त्यास नागरिकांचा विरोध आहे, असे स्पष्टीकरण शिवसेना-भाजपने सभागृहात दिले. तर ठाणे शहरातील अन्य भागात रस्त्यांचे रुंदीकरण मोहीम राबविण्यात आली, त्या वेळी एकाही नगरसेवकाने विरोध केला नाही. मात्र, हे पाचही रस्ते शहरातील व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या भागातील रुंदीकरणाचा प्रस्ताव नामंजूर करण्यामागे मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय येत आहे, असा आरोप मनोज शिंदे यांनी केला.