शिवसेना, भाजपच्या पक्षांतर्गत बैठका; शक्तीची चाचपणी करून जागावाटपाचे सूत्र

मुंबई महापालिकेत युतीसाठी पारदर्शी कारभाराची अट पुढे करत चर्चेचा श्रीगणेशा करणारे शिवसेना-भाजपचे नेते ठाण्यात मात्र आत्मचिंतनात मग्न असल्याचे चित्र दिसू लागले असून शिवसेनेसोबत बैठकांचा फड रंगविण्यापूर्वी आपली कुवत किती याचा अंदाज भाजपचे नेते घेत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. भाजपच्या प्रदेश पातळीवरून करण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात ठाण्यात पक्षाची उडी तिशीपल्याड जात नसल्याने युतीच्या चर्चेस सुरुवात करताना शिवसेनेपुढे नेमक्या किती जागांचा प्रस्ताव मांडायचा याचा विचार भाजपच्या गोटात सुरू आहे. यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील यांच्यासह भाजपच्या ठाण्यातील नेत्यांची एक बैठक येत्या दोन दिवसांत आयोजित करण्यात आली असून त्यानंतर युतीच्या चर्चेचा नारळ वाढविण्यात येणार आहे.

आठवडाभरापूर्वी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या राज्यस्तरीय चिंतन बैठकीत स्थानिक नेत्यांनी ‘एकला चलो रे’ची हाक देत ‘ठाण्याच्या विकासासाठी युती तोडा’ असा सूर आळवला. सद्य:स्थितीत ठाणे महापालिकेत भाजपचे जेमतेम आठ नगरसेवक असले तरी विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा पक्षाला मिळेल अशी शक्यता पक्षाच्या स्थानिक नेत्यांना वाटते. याशिवाय युती झाली नाही तरी पक्षाला गमाविण्यासारखे फार काही नाही, असे पक्षातील एका मोठय़ा गटाचे म्हणणे असून शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये यानिमित्ताने पक्षाचा जनाधार वाढविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी रणनीती स्थानिक नेत्यांकडून मांडली जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेसाठी युतीची प्राथमिक बोलणी सुरू झाली असली तरी ठाण्यात मात्र दोन्ही पक्षांकडून स्वबळाचा अंदाज घेतला जात आहे.

शिवसेनाही आक्रमक

विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपने विजयाचा झेंडा रोवला असला तरी शिवसेनेची संघटनात्मक ताकद आजही भाजपपेक्षा किती तरी सरस आहे. त्यामुळे भाजपची आव्हानाची भाषा खपवून घ्यायची नाही, असा एकंदर सूर शिवसेनेच्या गोटात उमटू लागला आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ५३ नगरसेवक निवडून आले होते. तत्कालीन काँग्रेस नेते रवींद्र फाटक यांच्या शिवसेना प्रवेशामुळे हे संख्याबळ ६० पर्यंत पोहोचले असून येत्या काही दिवसांत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा पक्षप्रवेश झाल्याने शिवसेनेच्या ६५ पेक्षा अधिक जागांवर विद्यमान नगरसेवक आहेत. त्यामुळे १३१ जागांपैकी अध्र्या अधिक जागांवर शिवसेनेकडे हक्काचे नगरसेवक असून त्यामुळे भाजपच्या वाटय़ाला ३० ते ३५ पेक्षा अधिक जागा सोडल्या जाऊ नयेत, असे सेनेच्या गोटात ठरते आहे. भाजप नेत्यांनाही या परिस्थितीचा अंदाज असल्याने युतीची चर्चा करताना नेमक्या किती जागांचा फॉर्मुला मांडायचा यावर पक्षाच्या गोटात खल सुरू असून पुढील दोन दिवसांच्या आत्मचिंतनानंतरच या बैठकांना सुरुवात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेनेसोबत युतीच्या चर्चेला अद्याप सुरुवात झाली नसली तरी येत्या दोन दिवसांत या बैठका सुरू होतील. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पातळीवर शिवसेनेतील काही स्थानिक नेत्यांसोबत वरकरणी चर्चा झाली असली तरी जागावाटपाचा ठोस फॉर्मुला अद्याप पुढे आलेला नाही.

– संदीप लेले, शहर अध्यक्ष भाजप