शिवसेनेशी संबंधित मंडळांचा गणेशोत्सव रस्त्यावरच
पालिकेची परवानगी असल्याचा दावा
शहरातील रस्ते अडवून उत्सव साजरा करण्याच्या मंडळांच्या मनमानीला ठाणे महापालिकेच्या आचारसंहितेमुळे चाप बसणार असला तरी महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेच्या नेते-पदाधिकाऱ्यांशी संबंधित मंडळांनी ही आचारसंहिता धुडकावून लावली आहे. एकीकडे कायदेशीर कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी राष्ट्रवादीप्रणित गणेशोत्सव मंडळे सावधगिरी बाळगत असताना सेनेशी संबंधित मंडळांनी मात्र रस्त्यावरच दहीहंडी तसेच गणेशोत्सवाचे मंडप उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीही उत्सवकाळात सर्वसामान्य तसेच वाहनचालकांची अडवणूक होण्याची शक्यता आहे. ठाणे शहरात पुरेशी मैदाने वा मोकळी जागा नसल्याचे कारण देत वर्षांनुवर्षे रस्त्यावरच दहीहंडी, गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यातही राजकीय नेत्यांची मंडळे आघाडीवर असतात. रस्त्यावरील वाहतूक, वर्दळीचा विचार न करता उभारण्यात येणाऱ्या मंडपांमुळे उत्सवकाळात संपूर्ण शहराची वाहतूक व्यवस्था कोलमडून पडते. या पाश्र्वभूमीवर, मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरे करण्यासाठी धोरण तयार करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिकेने तयार केलेल्या नव्या आचारसंहितेत रस्त्याचा एक चतुर्थाश भाग व्यापेल, इतकाच मंडप उभारण्याची परवानगी देण्यात आली होती. याशिवाय कमी रुंदीच्या रस्त्यांवर गणेशोत्सवाचे मंडप उभारण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली होती.पालिकेच्या आचारसंहितेमुळे यंदा शहरातील रस्ते अडणार नाहीत, अशी चिन्हे होती. मात्र काही सार्वजनिक मंडळांनी दहीहंडी तसेच गणेशोत्सवासाठी रस्त्यावर मंडप उभारण्यास सुरुवात केली आहे. किसननगर, जांभळीनाका, खोपट, वागळे इस्टेट, घोडबंदर आदी भागांतील रस्ते तसेच पदपथांवर नियमबाह्य़पणे मंडप उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये शिवसेनेशी निगडित मंडळे आघाडीवर असल्याचे चित्र आहेत. विशेष म्हणजे, यातील काही मंडळांनी या मंडपांसाठी पालिकेकडून परवानगी मिळाली असल्याचा दावा केला आहे. किसननगर भागात गणेशोत्सवाच्या विद्युत रोषणाईसाठी मुख्य रस्त्याच्या बाजूचे पेव्हर ब्लॉक उखडून तिथे बांबू रोवण्यात आले आहेत. तसेच याच भागातील अंतर्गत रस्त्यावर भला मोठा मंडप उभारण्याचे काम सुरू आहे.
मंडपासाठी बस थांबा बंद..
घोडबंदर येथील खेवरा सर्कल परिसरात शिवसेनेच्या एका नेत्याने गणेशोत्सवासाठी भला मोठा मंडप उभारला असून या मंडपाविरोधात वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतला होता. एक चतुर्थाश जागेपेक्षा जास्त जागेवर मंडप उभारण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे होते. मात्र हा मंडप नियमानुसारच उभारण्यात आल्याचा दावा करणारे पत्र महापालिकेने वाहतूक पोलिसांना दिले आहे. तसेच मंडपाच्या लांबीमुळे या भागातील बस थांबा मंडपाआड गेल्याने नागरिकांची गैरसोय होऊ शकते, असेही वाहतूक पोलिसांनी महापालिकेस कळविले होते. मात्र या उत्सवाकरिता हा बस थांबा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्याचे पत्र महापालिकेने वाहतूक पोलिसांना दिले आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.