ध्वनिप्रदूषणाच्या कडक नियमांचे पक्षाकडून उल्लंघन?

न्यायालयाने ध्वनिप्रदूषणासंबंधी आखलेल्या कडक नियमांमुळे कारवाईच्या धास्तीने मंगळवारी ठाणे परिसरातील बहुतांश दहीहंडी उत्सव मंडळांनी आवाजाचा पारा कमी केल्याचे दिसून आले. गेल्यावर्षी आवाजाची पातळी ओलांडणाऱ्या मंडळांविरोधात ठाणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. हा अनुभव ताजा असल्याने यंदा उत्सवातील दणदणाट काहीसा कमी झाला असला तरी सत्ताधारी शिवसेनेने मात्र जांभळी नाका परिसरातील शांतता क्षेत्रात चित्रपट संगीताच्या दणदणाटात अक्षरश धिंगाणा घातल्याचे चित्र होते. मोठय़ा आवाजात चित्रपट संगीत वाजविण्यात आल्याने या परिसरातील आवाजाची पातळी ९० ते ९५ डेसिबलपर्यंत पोहचल्याचा अभ्यासकांचा दावा आहे.

काही दिवसांपूर्वी दहीहंडीविषयक नियम न्यायालयाने शिथिल केल्याने मंगळवारी ठाणे शहरात ठिकठिकाणी गोंविंदांचे उंच थर लागल्याचे दिसून आले. काही ठिकाणी गुन्हे दाखल होतील या भीतीने आयोजकांकडून आवाजाच्या नियमांची खबरदारी घेण्यात आली होती. भगवती शाळेच्या मैदानातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहीहंडीत डीजेचे मोठे स्पीकर ठेवण्यात आले नव्हते. कोणत्याही प्रकारचे संगीत या दहीहंडीत वाजवण्यात आले नव्हते. तरीही या ठिकाणची आवाजाची पातळी ७० ते ८० डेसिबलपर्यंत पोहचली होती, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक आणि याचिकाकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी लोकसत्ताला दिली. केवळ मोठय़ा संख्येने जमलेले गोविंदा आणि त्यांच्याकडून वाजवण्यात येणाऱ्या पिपाण्या यामुळे या परिसरातील आवाजाची पातळी ९० डेबिसलपर्यंत पोहचली होती, असा दावा त्यांनी केला. टेंभीनाका परिसरातील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीच्या ठिकाणी चित्रपटाचे संगीत न वाजवता देशभक्तीपर गाणी लावण्यात आली होती. या परिसरात असलेल्या वाहनांच्या आवाजाची भर पडल्याने या परिसरात ८० ते ८५ डेसिबलपर्यंत आवाज पोहचला होता. वर्तकनगर परिसरातील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीत आवाजाची पातळी कमी ठेवण्यात आली होती.

शांतता क्षेत्रात धिंगाणा

जांभळी नाका परिसरातील डॉ. मालतीबाई चिटणीस रुग्णालय परिसर शांतता क्षेत्रात येत असला तरी या ठिकाणी असणाऱ्या खासदार राजन विचारे यांच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या दहीहंडीत मोठय़ा आवाजात चित्रपट संगीत लावून नाचगाणी सुरू होती. दरम्यान या परिसरातील आवाजाची पातळी सकाळच्या वेळी ९० ते ९५ डेसिबलपर्यंत पोहचली होती. हा परिसर शांतता क्षेत्रात येत असला तरी मोठय़ा संगीतासाठी परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल डॉ. बेडेकर यांनी उपस्थित केला.

गेल्या दोन वर्षांपासून दहीहंडीच्या उत्सवात आवाजाची पातळी कमी झाली आहे. आवाजाची मर्यादा पाळून शांततेत उत्सव साजरे करता येऊ शकतात. उत्सव साजरे करणाऱ्याला विरोध नाही. शहरातील मोठय़ा मैदानांच्या ठिकाणी असे उत्सव साजरे केल्यास स्थानिक रहिवाशांचा त्रास दूर होईल.

– डॉ. महेश बेडेकर, सामाजिक कार्यकर्ते

ठाण्यातील दहीहंडी उत्सवातील आवाजाची मोजणी काही सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत करण्यात आली असली, तरी पोलिसांकडून यासंबंधी स्वतंत्र मोजणी सुरू आहे. त्याचा अहवाल पाहून कारवाई केली जाईल.

– डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस उपायुक्त ठाणे