ठाणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदी कळव्यातील नगरसेविका अनिता गौरी यांची निवड करताना शिवसेना नेतृत्वाने ठाणे महापालिकेत ज्येष्ठ म्हणविणाऱ्या नगरसेवकांना वाटण्याच्या अक्षता लावल्या आहेत. या पदासाठी माजी महापौर अशोक वैती आणि नौपाडय़ासारख्या भागातून तब्बल सहावेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले विलास सामंत या दोघांची नावे आघाडीवर होती. मात्र, या दोघांसह इतर ज्येष्ठांनाही डावलत गौरी यांची झालेल्या निवडीमुळे येथील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 संजय मोरे यांची महापौरपदी निवड झाल्यापासून ठाणे महापालिकेच्या सभागृहाचा आखाडा होऊ लागला आहे. सभागृहात अत्यंत किरकोळ मुद्दय़ावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बाचाबाचीचे प्रसंग घडत असून महापौरांकडे सभागृहाचे कामकाज मार्गी लावण्याचे कसब नाही, अशी कुजबुज सत्ताधारी नगरसेवकांच्या गोटातही सुरू झाली आहे. महापौर मोरे प्रभावहीन ठरत असल्याने सभागृह नेत्याची भूमिका महत्त्वाची मानली जात होती. या पाश्र्वभूमीवर सभागृह नेतेपदी अनुभवी व्यक्तीची निवड अपेक्षित मानली जात होती. त्यामुळे या पदासाठी माजी महापौर अशोक वैती आणि विलास सामंत या दोन अनुभवी नेत्यांची नावे चर्चेत होती. असे असताना कळव्यातील ज्येष्ठ नगरसेविका अनिता गौरी यांची या पदावर निवड करत शिवसेनेने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिल्याची चर्चा रंगली आहे. सभागृहातील सध्याची स्थिती लक्षात घेऊन गौरी यांची या पदावर झालेली निवड धाडसाची मानली जात आहे. विरोधी पक्षाचे नगरसेवक अगदी लहान मुद्दय़ावर सातत्याने आक्रमक होत असताना त्यांना कौशल्याने हाताळण्याचे आव्हान गौरी यांनी पेलवेल का, हे पाहण्यासारखे ठरेल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केली.