शिवसेनेच्या आरोपानंतर तणाव; निवडणुकीच्या भरारी पथकाकडून आरोपाचे खंडन

भाईंदर पूर्व येथील प्रभाग क्रमांक ५ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांकडून रात्री उशिरा प्रचार आणि पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आल्याने सोमवारी रात्री मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून या उमेदवारांना सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात नेल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. निवडणुकीच्या भरारी पथकाने मात्र भाजप उमेदवारांकडे आक्षेपार्ह असे काहीही आढळले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

खारीगाव, केबिन रोड परिसरातल्या प्रभाग ५ मध्ये भाजपकडून राकेश शहा, मेघना रावल, वंदना पाटील आणि प्रकाश जिलेदार सिंह हे चार उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हे उमेदवार नर्मदानगर येथील वैशाली इमारतीत प्रचार करत असल्याची तक्रार आचारसंहिता पथकाकडे करण्यात आली. भरारी पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत इमारतीजवळ मोठा जमाव जमला. यात शिवसैनिकही मोठय़ा प्रमाणावर होते. भाजप उमेदवारांकडून रहिवाशांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. वातावरण तापले असतानाच पोलीसही घटनास्थळी आले. या वेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी होऊ लागली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता वाटत असल्याने पोलिसांनी तातडीने भाजपच्या उमेदवारांना गाडीतून नवघर पोलीस ठाण्यात नेले. पोलीस ठाण्याबाहेरही दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने जमले होते. रात्री उशिरापर्यंत वातावरणात तणाव निर्माण झाला होता.

आचारसंहिता भरारी पथकाने मात्र भाजप उमेदवारांकडे प्रचार साहित्य अथवा पैसे आढळून आले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करण्यात आले आहे. चित्रीकरण तपासण्यात आल्यानंतर भरारी पथकाकडून त्याचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे.

आणखी १७ कर्मचाऱ्यांवर गुन्हा ; निवडणूक कामासाठी गैरहजर राहिल्याने कारवाई

मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीचे काम न स्वीकारणाऱ्या १५ अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी गुन्हे दाखल करण्याची घटना ताजी असताना हे काम नाकारणाऱ्या आणखी १७ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आणि भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

ठाणे महानगरपालिकेचे बंडू झगडे, छोतीलाल गवळी, आकाश बारवे, सचिन कदम, नवी मुंबई महानगरपालिकेचे जितेश मढवी, सुहास टकले, संदीप म्हात्रे, बळीराम जाधव, विनोद जैन, आत्माराम काळे, आनंद पाटील, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे जितेंद्र पाटील, शिवप्रकाश मुराई, शशीम केदार, महेश डावरे आणि भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे अविनाश चव्हाण, अमोल तांबडे यांची निवडणुकीच्या कामासाठी क्षेत्रीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ तसेच पंचायती आणि नगरपालिका निवडणुका अध्यादेश १९९५चा नियम २ नुसार या कर्मचाऱ्यांनी निवडणूक कामी तात्काळ हजर होणे आवश्यक होते, परंतु कोणतेही लेखी कारण न देता हे कर्मचारी १२ ऑगस्टपर्यंत हजर झाले नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

-राम भालसिंग, वरिष्ठ निरीक्षक,  नवघर पोलीस ठाणे