अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीचा राग
अंबरनाथमध्ये भाऊबीजेच्या दिवशी मनसे व शिवसैनिकांमध्ये हाणामारी झाली. मनसेचे माजी नगरसेवक, त्याचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडल्याने येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
भाऊबीजेच्या सायंकाळी मनसेचे माजी नगरसेवक कुणाल भोईर यांचा भाचा शुभम हा कानसई भागातून जात असताना काही शिवसैनिकांसोबत त्याची बाचाबाची झाली. या प्रकरणी सेनेचे मनोज शेलार यांनी वाद मिटविण्यासाठी शुभमला बोलवले होते. मात्र वाद मिटण्याऐवजी तेथे शाब्दिक चकमक उडाली. ही घटना कळताच मनसेचे माजी नगरसेवक कुणाल भोईर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेलार यांच्या कार्यालयात घुसून काहींना मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शिवसेनेच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याची तक्रार आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत मदत न केल्याचा राग मनात धरून हा प्रकार झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.
या प्रकरणी अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. दोन्ही गटांनी बचावासाठी हा प्रकार केल्याचे स्पष्ट केले आहे.