कल्याण-डोंबिवली निवडणुकीच्या तोंडावर मोठय़ा प्रमाणात पक्षांतराचे संकेत
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील काही दिग्गज नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश घेण्याच्या तयारीत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या निवडणुकीत युती करण्याच्या मुद्दय़ावर शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. असे असताना शिवसेनेच्या काही नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू झाल्याने युती झाली तरी त्याचे फलित काय असेल, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अवस्था फारच बिकट असून या पक्षाच्या विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग आरक्षण प्रक्रियेत बाद झाले आहेत. त्यामुळे सुरुवातीला मनसे नगरसेवकांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी गळ टाकणाऱ्या शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी आरक्षण प्रक्रियेनंतर हे प्रयत्नही थांबविले. युतीची चर्चा सुरू झालीच तर भाजपवर दबाव वाढविता यावा यासाठी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना गळाला लावण्याची मोहीम हाती घेतली होती. राष्ट्रवादीतील जवळपास निम्म्याहून अधिक नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला असून जागा वाटपाच्या बोलणीत या नगरसेवकांच्या जागा सोडण्याचा आग्रह शिवसेनेकडमून धरला जाण्याची शक्यता आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्याही परिस्थितीत शिवसेना-भाजपची युती व्हावी असे वाटते आहे. शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघाचा मोठा भाग कल्याण-डोंबिवली महापालिकेत मोडतो. त्यामुळे येत्या निवडणुकीत पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था लक्षात घेता शिवसेनेला या दोन्ही पक्षांपेक्षा भाजपकडून यंदा कडवी लढत झेलावी लागेल, असे चित्र आहे. त्यामुळे युती व्हावी यासाठी शिंदे स्वत: प्रयत्नशील आहे. मागील पाच वर्षांत ठोस विकासकामांच्या मुद्दय़ावर शिवसेनेकडे फारसे काही सांगण्यासारखे नाही. त्यामुळे भाजपशी पंगा घेण्याऐवजी जुळवून घेण्याकडे शिवसेना नेत्यांचा कल दिसू लागला आहे. या पाश्र्वभूमीवर शिवसेना आणि मनसेचे काही वरिष्ठ नेते भाजपशी संपर्क साधू लागल्याने युतीमधील दरी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
महापालिका निवडणुकीत सेना-भाजप युती झाली नाही तर आपली पुढील राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल, अशी भीती काही दिग्गज मंडळींना आहे. तर काही जण महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती पदे मिळतील या आशेने भाजपच्या वाटेवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कल्याण पूर्व, डोंबिवली पश्चिमेतील सेना, मनसेमधील मंडळींचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मनसुबा आहे. या अयाराम मंडळींनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. पालकमंत्री िशदे आणि भिवंडीचे खासदार कपील पाटील यांनी युतीची बोलणी सुरू केली आहेत. असे असताना दोन्ही पक्षांत फोडाफोडीचे राजकारण अद्याप सुरू असल्याने युती झाली तरी किती फलदायी ठरेल, असा प्रश्न दोन्ही पक्षांत उपस्थित केला जात आहे.