शिवसेनेची निवडणूक घोषणा; भाजपकडून खिल्ली

मुंबई, ठाण्यापाठोपाठ मीरा-भाईंदरमध्येही मतदारांना आकर्षित करण्यासाठी ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून मुक्त करण्यात येईल, अशी घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली आहे. भाजपकडून मात्र शिवसेनेच्या या घोषणेची खिल्ली उडवण्यात आली. मुंबईत मालमत्ता कर माफ करण्याच्या घोषणेचे काय झाले याचा आधी खुलासा करा, अशी मागणी भाजपने केली आहे.

मतदानाला आता अवघे १२ दिवस शिल्लक राहिले असताना राजकीय पक्षांकडून घोषणांचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. याची सुरुवात निवडणूक घोषित होण्याआधी मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता शिवसेनेनेकडूनही त्याचा कित्ता गिरवण्यात येत आहे.  मीरा-भाईंदर महानगरपालिकेत स्वबळावर सत्ता आली तर ५०० चौ. फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करून सर्वसामान्यांना दिलासा देण्यात येईल तसेच ७०० चौ. फुटापर्यंतच्या घरांना करात सवलत देता येईल का याचा विचार सुरू असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. मीरा-भाईंदर महापालिकेचा आर्थिक डोलारा मालमत्ता कराच्या वसुलीवरच अवलंबून असल्याने करमाफीमुळे तिजोरीवर मोठा आर्थिक ताण येणार आहे. त्यामुळे विविध मार्गानी उत्पन्न वाढवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात येईल, असे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. भ्रष्टाचारमुक्त आणि स्वच्छ सुंदर मीरा-भाईंदर या मुद्दय़ांवर शिवसेना निवडणूक लढवत आहे. रस्ते, पाणी आणि गटारे यासोबतच मीरा-भाईंदरला स्मार्ट सिटी बनवण्यावर सेनेचा भर असणार असल्याचे यावेळी शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाकडून मात्र शिवसेनेच्या मालमत्ता कर माफ करण्याच्या घोषणेचा समाचार घेण्यात आला आहे. मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकींमध्येही शिवसेनेकडून मालमत्ता कर माफ करण्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. या घोषणांचे पुढे काय झाले याचा खुलासा शिवसेनेने आधी करावा आणि मगच मीरा-भाईंदरच्या नागरिकांना आश्वासन द्यावे, असा टोला आमदार नरेंद्र मेहता यांनी लगावला आहे. स्थानिक स्तरावर आम्ही भ्रष्टाचार केला, असे शिवसेनेला वाटत असेल तर ते महापालिकेत इतका काळ आमच्यासोबत का राहिले याचे त्यांनी उत्तर द्यावे आणि भ्रष्टाचार नेमका कसा झाला हे शिवसेनेने दाखवून द्यावे, असे आव्हान मेहता यांनी सेनेला दिले आहे.

भाजपचे गटनेते अखेर शिवसेनेत

एबी फॉर्मच्या घोटाळ्यामुळे पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळालेले आणि पक्षाकडून फसवणूक झाल्याचा आरोप करणारे भाजपचे गटनेते शरद पाटील आता शिवसेनेत सामील झाले आहेत. शिवसेनेने त्यांना प्रभाग १८ मध्ये पुरस्कृत केले आहे. पाटील यांना त्यांच्या मूळच्या खारीगाव प्रभागात उमेदवारी न देता भाजपने त्यांना मीरा-रोडच्या प्रभाग १८ मध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सांगून या जागेसाठीचा एबी फॉर्म दिला, परंतु भाजपकडून या जागेसाठी अगोदरच दुसऱ्या उमेदवाराला एबी फॉर्म देण्यात आला होता. या उमेदवाराने पाटील यांच्या आधी एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केल्यामुळे पाटील हे पक्षाचे अधिकृत उमेदवार होऊ शकले नाहीत. अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात राहिलेल्या पाटील यांनी स्थानिक नेत्यांवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. भाजपमधील या बंडाळीचा फायदा शिवसेनेने उचलला असून अपक्ष उमेदवार शरद पाटील यांना प्रभाग १८ मध्ये शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. या ठिकाणी सेनेच्या अधिकृत उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याने शरद पाटील हे आता शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित झाले आहेत.