ठाणे महापालिकेने उभारलेल्या तरण तलाव संकुलाच्या माध्यमातून ठाणेकरांची लूट करीत नफेखोरी करणाऱ्या ठेकेदाराने महापालिकेचा किती कर थकविला आहे, असा प्रश्न उपस्थित करीत ‘ठाणे क्लब’च्या मुद्दय़ावरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत आक्रमक रूप धारण केले. मात्र त्याबरोबर सत्ताधारी शिवसेनेला विस्थापितांची आठवण आली आणि तो मुद्दा पुढे करीत त्यांनी ही सभाच गुंडाळली. त्यामुळे या प्रकरणातील संशयाचे धुके अधिक गडद झाले आहे.
तीन हात नाका परिसरात महापालिकेने ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव उभारला असून या क्लबच्या ठेकेदाराने महापालिकेचे सर्व नियम पायदळी तुडवत वार्षिक सदस्य शुल्कात पाच पटीने वाढ केली आहे. या संदर्भात गुरुवारी ‘लोकसत्ता’मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले. त्याचा आधार घेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी, या ठेकेदारासोबत भाडेकरार कोणत्या दराने करण्यात आला, तो रेडीरेकनर दरानुसार आहे का, ठेकेदाराने महापालिकेचा किती कर थकविला आहे, असे प्रश्न उपस्थित करीत महापालिका प्रशासनाकडे यासंबंधी सविस्तर माहिती मागितली. विरोधी पक्ष नेते हणमंत जगदाळे, राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला, काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण, मनोज शिंदे आदी नगरसेवक या मुद्दय़ावरून आक्रमक झाले होते. परंतु या मुद्दय़ापासून शिवसेना दूर पळत असल्याचे चित्र सभागृहात पाहावयास मिळाले.
सभागृहात विस्थापितांच्या मुद्दय़ावर चर्चा सुरू असल्याने आधी ती पूर्ण होऊ द्यावी अशी मागणी शिवसेनेने रेटली. त्यावर या चर्चेनंतर तरण तलावाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांकडे वेळ मागितला. मात्र विस्थापितांना न्याय मिळत नसल्याचे कारण पुढे करीत गेली अनेक वर्षे महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेने सर्वसाधारण सभा गुंडाळली. यामुळे अधिकच आक्रम झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांनी शिवसेनेचा तसेच महापौरांचा निषेध केला. यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.