डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांमध्ये आगामी महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकावा यासाठी संघर्ष समितीच्या नेत्यांनी एकीकडे प्रयत्नांची पराकाष्ठा चालवली असताना शिवसेनेने मात्र संघर्ष समितीला शह देणारी रणनीती आखली आहे. संघर्ष समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा वरचष्मा राहिला आहे. ही गावे महापालिकेत यावीत यासाठी सुरुवातीपासून शिवसेनेचे नेते आग्रही आहेत. या गावांमधील २१ प्रभागांमध्ये उमेदवारांची शोधमोहीम शिवसेनेने हाती घेतली असून, होतकरू महिला कार्यकर्त्यांना संधी देण्याची रणनीती आखली जात आहे.
२७ गावांमध्ये कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीचे २१ प्रभाग आहेत. सर्वपक्षीय ग्रामीण संघर्ष समितीने या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची व्यूहरचना आखली आहे. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या प्रभागांमध्ये बिनविरोध निवडणुका करून संघर्ष समितीला शह देण्याची तयारी शिवसेनेच्या गोटातून आखली जात असल्याचे समजते. संघर्ष समितीला बहिष्कारासाठी पाठिंबा दर्शविणारे अनेक इच्छुक पालिकेची निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.
शिवसेनेने वर्चस्व असलेल्या प्रभागांमध्ये उमेदवार उभे केले किंवा या प्रभागांमध्ये बिनविरोध निवडणुका करून घेतल्या, तर संघर्ष समितीच्या बहिष्कारातील हवा निघून जाणार आहे. निवडणूक लढवण्याची इच्छा असलेला, पण संघर्ष समितीच्या बहिष्कारामुळे निवडणुकीपासून दूर राहिलेला एक गट पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होताच आक्रमक होण्याची शक्यता आहे. शिवसेनेची तयारी पाहता इतर पक्षांतील इच्छुकांनीही वेगवेगळ्या प्रभागात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे बहिष्काराची भाषा करणारे संघर्ष समितीचे नेते अडचणीत आले आहेत. त्यामुळेच संघर्ष समितीच्या नेत्यांनी मानपाडा येथे शनिवारी एका बैठकीचे आयोजन केले आहे. यावेळी २१ प्रभागांमधील १५ प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी जे इच्छुक उमेदवार होते ते बाजूला पडले आहेत. त्यांनी घरातील महिलांना पुढे करून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. समितीत अग्रभागी असलेल्या नेत्यांच्या या उद्योगांमुळे वरिष्ठ नेते अस्वस्थ झाले आहेत.

गावे पालिकेत समाविष्ट झाली आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे जे आदेश देतील त्याप्रमाणे शिवसैनिक भूमिका घेतील. नेत्यांच्या आदेशाशिवाय निवडणूकविषयक आम्ही कोणतेही पाऊल उचलणार नाही. शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते असल्याने आमच्या हातून कोणतीही स्वत:हून चूक होणार नाही.
सदाशिव गायकर, शिवसैनिक, गोळवली

संघर्ष समिती हा आमचा समाज आहे. त्यामुळे समिती काय निर्णय घेते ते महत्त्वाचे आहे. भाजपचे आम्ही निष्ठावान कार्यकर्ते आहोत. समितीचा निर्णय व पक्षाकडून काय आदेश येतो त्याप्रमाणे
आम्ही आमची भूमिका ठरवणार आहोत.
रमाकांत पाटील, भाजप, गोळवली

२७ गावांमधील २१ प्रभागांमध्ये बहिष्कार कायम राहावा यासाठी संघर्ष समिती प्रयत्न करणार आहे, परंतु शिवसेनेचा एक गट समितीबरोबर नाही. या गटाकडून प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे. अशावेळी अनेक इच्छुक निवडणूक रिंगणात उतरतील. तेव्हा आरपारची लढाई संघर्ष समितीकडून खेळली जाईल. यामध्ये कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही. यासाठी ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे.
– गुलाब वझे, उपाध्यक्ष, संघर्ष समिती

आमच्या गावांवर क्षेपणभूमीची आरक्षणे टाकली आहेत. आम्हाला कचऱ्यात टाकण्याचा प्रयत्न शासनाकडून झाला आहे. संघर्ष समितीबरोबर असल्याने निवडणुकीवर आमचा बहिष्कार कायम असेल. पण समितीचा बहिष्कार असूनही अन्य कोणी इच्छुक निवडणूक लढविण्याची तयारी करणार असतील, तर आमच्या हक्कासाठी आम्ही निवडणूक लढविणार आहोत.
 – गजानन म्हात्रे, भाल गाव