कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करून शिवसेनेला धोबीपछाड दिल्याचा फटका ठाण्यात भाजपला बसला आहे. कल्याणमधील पराभवाचे उट्टे काढत शिवसेनेने सोमवारी स्थायी समिती सभापतिपदासाठी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश म्हस्के यांचा अर्ज दाखल करून भाजपला धक्का दिला.
महापालिकेतील सत्तासमीकरणानुसार यंदा स्थायी समितीचे सभापतिपद भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांना देण्याचा करार दोन्ही पक्षांत पक्का झाला होता. ठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय केळकर यांच्या कट्टर समर्थकांपैकी वाघुले ओळखले जातात. वाघुले यांची या पदावर वर्णी लागावी यासाठी स्थायी समितीमधून शिवसेनेने आपल्या एका सदस्याचा राजीनामा घेत त्यांना सदस्यपद बहाल केले होते. स्थायी समितीत भाजपचा अवघा एक सदस्य असताना वाघुले यांना हे पद द्यावे का, याविषयी शिवसेनेमध्ये कमालीची अस्वस्थता होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या भाजपप्रेमामुळे शिवसेनेत कमालीची अस्वस्थता असताना कल्याणच्या गद्दारीचे आयते निमित्त शिवसेना नेत्यांना मिळाले असून हे कारण पुढे करत भाजपला ऐन वेळी कात्रजचा घाट दाखविण्यात आल्याने या दोन्ही पक्षांत पुन्हा एकदा विसंवादाचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेनेने दिलेला शब्द मोडला, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार संजय केळकर यांनी याप्रकरणी ‘ठाणे लोकसत्ता’शी बोलताना दिली. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना भाजपने आपले रंग दाखवीत परिवहन सभापतिपदाच्या     
निवडणुकीत काँग्रेसला मतदान करत शिवसेनेला धक्का दिला. मीरा-भाइंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतही भाजपने राष्ट्रवादीसोबत केलेला संग शिवसेनेसाठी धक्कादायक ठरला होता. नवी मुंबई महापालिकेत भाजपचा अवघा एकमेव नगरसेवक असताना निवडणुकीला सामोरे जात असताना भाजपला तब्बल ४३ जागा सोडून शिवसेनेने स्वत:च्या पायावर कु ऱ्हाड मारून घेतल्याची चर्चा आता रंगली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ठाण्यात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने आपले उमेदवार उभे केले नव्हते. या बदल्यात यंदाचे स्थायी समिती सभापतिपद भाजपला देण्याचे आश्वासन पक्षाच्या नेत्यांनी पदरात पाडून घेतले होते. असे असले तरी कल्याण, भाइंदरमधील भाजपचे वर्तन आणि नवी मुंबईतील दारुण पराभवामुळे स्थायी समितीचे सभापतिपद भाजपला देऊ नये, यासाठी शिवसेनेतील नगरसेवकांचा नेत्यांवर दबाव वाढत होता. हा दबाव लक्षात घेऊन सोमवारी अर्ज भरण्याच्या दिवशी शिवसेनेने स्थायी समिती सभापतिपदासाठी सभागृह नेते नरेश म्हस्के यांचा अर्ज दाखल करत भाजपला धक्का दिल्याची चर्चा आता रंगली आहे.

‘शिवसेनेने शब्द पाळला नाही’
शिवसेना-भाजप युतीमध्ये कोणत्याही प्रकारचा विसंवाद नसून पुढील वर्षी स्थायी समितीचे सभापतिपद भाजपला देण्याचा निर्णय पक्का झाला आहे, अशी माहिती शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी ठाणे लोकसत्ताला दिली. नरेश म्हस्के यांचे स्थायी समिती सदस्य म्हणून हे अखेरचे वर्ष आहे. त्यामुळे भाजपने पुढील वर्षीपर्यंत थांबावे, अशी विनंती करण्यात आली आणि त्यांच्या नेत्यांनी ती मान्य केल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले. दरम्यान, या घडामोडींमुळे भाजपच्या गोटात मात्र नाराजीचा सूर असून शिवसेनेने दिलेला शब्द पाळला नाही, अशी प्रतिक्रिया आमदार संजय केळकर यांनी दिली.

जयेश सामंत, ठाणे