* अशोक वैती यांचा पक्षाला घरचा आहेर
* नगरसेवक पदाचा त्याग करण्याची धमकी
ठाणे महापालिकेत वर्षांनुवर्षे सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेत आता मतभेदांचे वारे वाहू लागले असून महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना वेळेत टॅब देता येत नसतील तर सत्ता हवी कशाला, असा सवाल करत पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी महापौर अशोक वैती यांनी पक्षाला घरचा आहेर दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅब देण्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न आहे आणि त्यासाठी ठाणे महापालिकेने अर्थसंकल्पामध्ये तीन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र त्यासंबंधी प्रक्रिया प्रशासनाने अद्याप सुरू केलेली नाही. हाच मुद्दा उपस्थित करत वैती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्तेमध्ये असतानाही पक्षप्रमुखांचे स्वप्न पूर्ण होणार नसेल तर अशी सत्ता हवी कशासाठी, असा सवाल उपस्थित करत नगरसेवक पद सोडण्याचा इशारा दिला. अखेर यासंबंधीचा प्रस्ताव येत्या पंधरा दिवसांत करण्यात येईल, असे आश्वासन महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले.
ठाणे महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या विषयपटलावर प्रभाग समिती स्तरावर संगणक खरेदी करण्याचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. या प्रस्तावावर चर्चा सुरू असतानाच नगरसेवक अशोक वैती यांनी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅब देण्यासंबंधीचा मुद्दा उपस्थित केला. नगरसेवकांना टॅब देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला, त्याच वेळी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनाही टॅब देण्यास मंजुरी देण्यात आली. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये सुमारे तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅब देण्याची मागणी पुढे आली होती. तसेच या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात यावेत, असे त्यांचे स्वप्न आहे. एकीकडे मुंबई महापालिकेने शाळांमध्ये टॅबचे वाटपही केले आहे, तर दुसरीकडे ठाणे महापालिकेने अर्थसंकल्पात तरतूद करूनही टॅब देण्याची प्रक्रिया सुरू केलेली नाही. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाही पक्षप्रमुखांचे स्वप्न पूर्ण होत नसेल आणि ज्या पक्षातून निवडून आलो, त्यांच्या घोषणांचा विसर पडत असेल तर कशासाठी हवी अशी सत्ता, असे सांगत त्यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला. तसेच पक्षप्रमुखांचे स्वप्न पूर्ण होणार नसेल तर आम्ही नगरसेवकपद सोडतो, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
या मुद्दय़ावरून आक्रमक झालेल्या वैती यांना सर्वपक्षीय नगरसेवकांनी साथ दिली. अखेर महापौर संजय मोरे यांनी यासंबंधी सविस्तर अहवाल तयार करून पुढील शैक्षणिक वर्षांत टॅब देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तर यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव येत्या १५ दिवसांत आयुक्तांना सादर करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दिले.

तर सत्तेत बसायचा अधिकार नाही..
महापालिकेतील नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना टॅब मिळाले, मग विद्यार्थ्यांना कधी मिळणार, असा सवाल उपस्थित करत वैती यांनी पक्षप्रमुखांचे स्वप्न पूर्ण होत नसेल तर आपल्याला सत्तेत बसायचा अधिकार आहे का, असा थेट सवाल केला आहे. वैती यांच्या या भूमिकेमुळे महापौर संजय मोरे यांच्यासह महापालिकेतील शिवसेनेचे पदाधिकारी अचंबित झाले आहेत.