ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेनेच्या वतीने दरवर्षी वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्नेहसंमेलन मोठय़ा उत्साहात साजरे करण्यात येते. यंदा मात्र हा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. वृत्तपत्र विक्रेते हेमंत जाधव व त्यांचा भाचा सचिन पवार यांचे मार्च महिन्यात अपघाती निधन झाले. उत्सवानिमित्त संकलित झालेल्या निधीतून एक लाख रुपयांची मदत जाधव कुटुंबीयांना करण्यात आली.
हेमंत जाधव यांच्या निधनाने जाधव कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात परिवारात जाधव यांची आई, विधवा बहीण, पत्नी, मुलगी व ६ वर्षांचा गतिमंद मुलगा आहे. त्यांच्या परिवाराची स्थिती हलाखीची असून त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी विक्रेता सेनेने यंदाच्या उत्सवाच्या खर्चात कपात करून तसेच इतर विक्रेत्यांकडून देणगी गोळा करून एक लाखाची आर्थिक मदत केली. शनिवारी टेंभीनाका येथील सूर्या कार्यालयात स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते जाधव यांच्या पत्नीस एक लाखाचा घनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी विक्रेता सेनेचे अध्यक्ष विष्णू सावंत, संतोष विचारे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमास पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर संजय मोरेही उपस्थित होते.