जैन, गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय मतदारांची लक्षणीय संख्या असलेल्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेची सत्ता कायम राखण्याचा भाजपचा प्रयत्न असला तरी बंडखोरी, पक्षांतर्गत कुरघोडय़ा, मराठी विरुद्ध बिगरमराठी अशी जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेली दरी त्यातून भाजपपुढे एकहाती सत्ता मिळविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेनेही जोर लावला असून, मुख्य लढत ही भाजप आणि शिवसेना या दोन मित्रपक्षांमध्येच अपेक्षित आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे.  गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आता नव्याने जोम चढला आहे. निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, बहुजन विकास आघाडी, स्थानिक आघाडी असे विविध पक्ष उतरले असले तरी भाजप आणि शिवसेनेत या दोन पक्षातच निकराची लढाई होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वात मोठा दावेदार म्हणून भारतीय जनता पक्षाकडे बघितले जात आहे. सुरुवातीच्या काळात भाजपकडून महानगरपालिकेच्या ९५ जागांपैकी ७५ जागा जिंकण्याची भाषा केली जात होती. मात्र परिस्थितीत वेळोवेळी झालेल्या बदलामुळे भाजपची ही भाषा बदलली आहे. मात्र तरीही ६० जागा जिंकण्याचा प्रबळ विश्वास भाजपकडून व्यक्त केला जात आहे. निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता आणि प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली असली तरी निवडणुकीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बारकाईने नजर आहे. वेळोवेळी शहरातील सर्व प्रभागांची आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जात आहे. त्यामुळे महापालिकेत एकहाती सत्ता स्थापन करण्याची मोठी जबाबदारी स्थानिक नेत्यांवर येऊन पडली आहे. परंतु बदलेल्या प्रभाग रचनेत संधी मिळणार नसल्यामुळे आणि तिकीट तसेच एबी फॉर्म वाटपात झालेल्या गोंधळामुळे पक्ष सोडून गेलेले नगरसेवक, पक्षाच्या उत्तर भारतीय आणि जैन मतांमध्ये विरोधकांकडून फूट पाडण्याचे होत असेलेले प्रयत्न, विरोधकांची अघोषित एकजूट, अंतर्गत गटबाजी यामुळे भाजप एकहाती सत्ता स्थापन करण्याइतपत संख्याबळ गाठेल की नाही, अशी साशंकता निर्माण करणारे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

शिवसेनेने भाजपला सत्तेपर्यंत पोहोचू द्यायचे नाही, असा चंगच बांधला आहे. यासाठी शक्य होईल त्या पद्धतीने भाजपला खिंडीत गाठण्याची एकही संधी शिवसेना वाया जाऊ दिलेली नाही. आतापर्यंत केवळ मराठी मतांवरच राजकारण खेळणाऱ्या शिवसेनेने यासाठीच आपली भूमिका बदलून सोशल इंजिनीयिरगची कास धरली. बहुसंख्य अमराठी भाषिक असलेल्या शहरात जम बसवण्यासाठी  प्रत्येक जातिधर्माला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. भाजपची मतपेढी असलेल्या जैन आणि उत्तर भारतीयांनाही सेनेने आपलेसे केले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे वजनदार नेते माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सा यांनाही आपल्यात सामावून घेतले. शिवसेना यावरच थांबली नाही तर भाजपमधील नाराज नगरसेवकांना हेरून त्यांनाही पक्षात सामील करून घेण्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन केले. परंतु हे सर्व करत असताना शिवसैनिकांमध्ये मात्र मोठय़ा प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. वर्षांनुवर्षे पक्षाचे काम करणाऱ्या शिवसैनिकांना डावलून बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्याचा फटका शिवसेनेला बसू शकतो. शिवसेनेने भाजपविरोधी वातावरणनिर्मिती करण्यात काही प्रमाणात यश मिळवले आहे. परंतु जैन, गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय समाजावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पगडा कायम आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सोशल इंजिनीयरिंगचा फायदा पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचवणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था सध्या फारच वाईट आहे. त्यांचे सर्वच्या सर्व म्हणजे २७ नगरसेवक पक्ष सोडून गेले असल्याने पक्षाला उमेदवार शोधण्यासाठी नव्याने तयारी करावी लागली आहे. मात्र या वाईट अवस्थेतदेखील पक्षाने ९५ पैकी ६७ जागांवर उमेदवार उभे केले ही पक्षाची जमेची बाजू म्हणता येईल. राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून आला नाही तरी किमान पक्षाचे घडय़ाळ हे चिन्ह टिकून राहील एवढीच अपेक्षा राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. निवडणूकीची संपूर्ण जबाबदारी माजी खासदार संजीव नाईक यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

काँग्रेसदेखील आपली ताकद टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहे. भाजप आणि शिवसेनेने केलेल्या नगरसेवकांच्या फोडाफोडीचा काँग्रेसलाही फटका बसला असला तरी मीरा रोडच्या शांतिनगर, शीतलनगर आणि नयानगरमध्ये आपली ताकद पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. त्यांनी ९५ पैकी ७६ जागांवर उमेदवार उभे केले आहेत आणि यापैकी किमान २० ते २५ जागा जिंकण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. मीरा रोड भागात काँग्रेसची ताकद निर्माण करण्यात माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचा महत्त्वाचा वाटा आहे. परंतु हुसेन सध्या आजारी असल्याने ते प्रचारासाठी पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत ही काँग्रेससाठी चिंतेची बाब ठरत आहे. तरीदेखील माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या दोन जाहीर सभांना त्यांनी उपस्थिती लावली आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्नही केला. आता हा जोश मतदारांना आपलेसे करण्यात किती यशस्वी ठरतो हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र त्यांचे ताकदवर नेते अरुण कदम शिवसेनेत गेल्याने सर्व जबाबदारी मनसेचे शहर अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्यावर येऊन पडली आहे. मनसेच्या प्रचारात भाजप-सेनेच्या महापालिकेतील कारभारावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत असला तरी मनसेच्या प्रचारात म्हणावा तसा जोर दिसून येत नाही. राज ठाकरे स्वत: या निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले नसल्याने मनसे फार मोठी चमकदार कामगिरी करील, अशी शक्यता दिसून येत नाही. याव्यतिरिक्त बहुजन विकास आघाडी, भाजपमधील नाराजांनी एकत्र येऊन स्थापन केलेला मिरा-भाईंदर संघर्ष मोर्चा आणि इतर छोटे पक्षदेखील रिंगणात आहेत परंतु काही प्रभाग वगळता त्यांचे अस्तित्व दिसून येत नाही. त्यामुळे खरा सामना भाजप आणि शिवसेनेतच रंगणार असून सत्तास्थापनेत काँग्रेस महत्त्वाची भूमिका निभावेल अशीच शक्यता सध्या तरी दिसून येत आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी ९५ पैकी ४८ हा जादूई आकडा गाठणे आवश्यक आहे. हा आकडा भाजप गाठते की सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि काँग्रेस भिवंडीच्या धर्तीवर एकत्र येते याबाबत मतदारांमध्ये मोठय़ा प्रमाणात उत्सुकता लागून राहिली आहे.

बहुमताची उत्सुकता

मीरा-भाईंदर महानगरपालिकेची सत्ता कायम राखण्याचा भाजपचा प्रयत्न असला तरी त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे.  सत्ता स्थापन करण्यासाठी ९५ पैकी ४८ हा जादूई आकडा गाठणे आवश्यक आहे. हा आकडा भाजप गाठते की सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि काँग्रेस भिवंडीच्या धर्तीवर एकत्र येते याबाबत मतदारांमध्ये मोठय़ा प्रमाणात उत्सुकता लागून राहिली आहे. शहरात जम बसवण्यासाठी  प्रत्येक जातिधर्माला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे.