जितेंद्र आव्हाड यांचे आव्हान मोडून १६ पैकी ८ जागी विजय

ठाणे शहरातील शिवसेनेच्या वर्चस्वाला टक्कर देण्याची ताकद भाजपने दाखवली असतानाच, सेनेनेही यंदा कळवा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला यंदा सुरुंग लावला. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची या परिसरावर मोठी पकड असल्याने कळव्यात पुन्हा एकदा घडय़ाळाचा गजर होईल, अशी अटकळ असताना सेनेने या ठिकाणच्या १६ पैकी ८ जागांवर विजय मिळवत आव्हाडांनाच धक्का दिला आहे.

राष्ट्रवादीला कळवा-मुंब्रा भागातून मोठय़ा विजयाची अपेक्षा होती. या मतदारसंघात महापालिकेच्या तब्बल ३६ जागा होत्या, तसेच दिव्यातील खर्डी भागातील तीन जागांवर राष्ट्रवादीचा दबदबा राहिला आहे. त्यामुळे कळवा आणि मुंब्य्रातून राष्ट्रवादीला ३२ जागा मिळतील असे निरीक्षण राजकीय विश्लेषक नोंदवत होते. मात्र, सेनेने कळव्यातील १६पैकी आठ जागा जिंकत राष्ट्रवादीला आणि आव्हाड यांना धक्का दिला.

कळवा परिसर एकेकाळचा शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र, जितेंद्र आव्हाडांनी स्थानिक नेत्यांची मोट बांधत गेल्या काही वर्षांत या भागात स्वतचा दबदबा तयार केला आहे. या भागात महापालिकेच्या माध्यमातून विकासकामांचा रतीब मांडण्यात आल्याने पाच वर्षांपूर्वी कळवेकरांनी आव्हाडांना साथ देताना शिवसेनेला जेमतेम सहा जागांवर विजय मिळवून दिला होता. त्याचा मोठा फटका शिवसेनेला सत्तास्थापनेच्या गणितांमध्ये बसला होता. यंदा मात्र शिवसेनेने या भागात जोरदार मुसंडी मारली. पारसिकनगर परिसरात मलनिस्सारण प्रकल्पास विरोध करत आव्हाडांनी जोरदार आंदोलन केले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही या ठिकाणी आणत शिवसेनेला त्यांनी आव्हान उभे केले होते. मात्र, पारसिकनगरचा मुद्दा निवडणुकीत चाललाच नाही. या ठिकाणी शिवसेनेच्या उमेश पाटील, मनोज लासे, अनिता गौरी या उमेदवारांना भरभरून मतदान झाले. याशिवाय सह्य़ाद्री, ओतकोनेश्वरनगर पॅनेलमधून शिवसेनेचे मातब्बर नेते राजेंद्र साप्ते यांचा पराभव करण्यात राष्ट्रवादीला यश आले असले तरी येथून मनाली पाटील यांचा पराभव झाला.

विटाव्यात धक्का

विटावा परिसरातील प्रभागातून प्रियंका पाटील आणि पूजा करसुळे या शिवसेनेच्या दोन उमेदवार विजयी झाल्या असून मनीषा साळवी यांच्या पराभवामुळे आव्हाडांना धक्का बसला आहे. विटावा तसेच आसपासचा परिसर एकत्र होत तयार करण्यात आलेल्या पॅनेलमध्ये तिकीट वाटप करताना पक्षात घोळ झाल्याने येथून जितेंद्र पाटील या उमेदवारास राष्ट्रवादीने पुरस्कृत म्हणून जाहीर केले होते. या पॅनेलमधून पाटील यांच्यासोबत आरती गायकवाड हे दोन उमेदवार विजयी झाले खरे, मात्र इतर दोन ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवताना विटाव्यातून एकगठ्ठा मते मिळविल्याने आव्हाडांची डोकेदुखी वाढली आहे.

कळवा

  • शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्येकी आठ जागा
  • सात ठिकाणी सेना, तर ६ ठिकाणी राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
  • तीन ठिकाणी भाजपला दुसऱ्या क्रमांकाची मते

मुंब्रा

  • २० पैकी ११ ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध एमआयएमची लढत
  • नऊ ठिकाणी राष्ट्रवादीचे तर दोन ठिकाणी एमआयएमचे उमेदवार विजयी
  • राष्ट्रवादीला पाच, एमआयएम नऊ, शिवसेना चार आणि काँग्रेसला एका ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची मते