अस्सल महाराष्ट्रीय वडापावसोबत परप्रांतीय असलेला समोसाही नाश्त्याच्या पंक्तीत अग्रमानांकित आहे. त्यातच दर दहा कोसांवर भाषा बदलते, तसे समोशाचे प्रकारही बदलत असतात. अशातलाच एक प्रकार म्हणजे पट्टी समोसा. बदलापूर पश्चिमेला कल्याण रोडलगत बेलवली येथे असलेले शिवप्रेरणा स्नॅक्स खास पट्टी समोशासाठी प्रसिद्ध आहे.

दहाव्या शतकात व्यापाऱ्यांसोबत भारतात आलेला समोसा आता भारतीयांच्या नाश्त्याचा अविभाज्य भाग बनला आहे. विविध रंगांत, विविध ढंगांत समोसा आपल्यासमोर आलेला दिसतो. त्यातलाच एक प्रकार म्हणजे पट्टी समोसा. सर्वसाधारण समोशापेक्षा जरा वेगळा दिसणारा, मात्र थोडी निराळी चव असलेला हा पट्टी म्हणजे समोशाचे एक अपडेटेड व्हर्जनच म्हणावे लागेल. बाहेरून एक वेगळे आवरण. आत खमंग चवीचे वटाणे बटाटय़ाचे मसालायुक्त आवरण अशी समोशाची ओळख. मात्र प्रत्येक ठिकाणी या मसाल्याच्या सारणाची चव वेगळी असते. या वैशिष्टय़पूर्ण पट्टी समोशाने बदलापूरसह अंबरनाथ आणि आसपासच्या खवय्यांची मने जिंकली आहेत. गेल्या सतरा वर्षांपासून बेलवली भागात शिवप्रेरणा स्नॅक्स कॉर्नरच्या माध्यमातून राजेंद्र बाळकृष्ण पातकर हे खवय्यांची मने तृप्त करत आहेत. त्यांच्या मालकीच्या असणाऱ्या ऐसपैस स्नॅक्स कॉर्नरमध्ये अवघे दोनच पदार्थ विकले जातात. एक वडापाव आणि दुसरा पट्टी समोसा. सकाळी सहा वाजता त्यांचे स्नॅक्स कॉर्नर सुरू होते, ते रात्री उशिरापर्यंत त्यांचा भटारखाना सुरू असतो. अनेकदा तर पदार्थ संपल्याने दुकान बंद करावे लागते, कारण अवघे दोन पदार्थ असूनही खवय्यांचा स्नॅक्स कॉर्नरभोवती कायम गराडा असतो.

‘‘सकाळपासून वडा आणि आमची विशेषता असलेल्या पट्टी समोशासाठी आम्ही मसाला तयार करण्यास सुरुवात करत असतो. साडेआठच्या सुमारास आमची संपूर्ण तयारी होऊन आम्ही बटाटेवडे काढण्यास सुरुवात करतो,’’ असे राजेंद्र पातकर सांगतात. त्यानंतर अकरा वाजता या स्नॅक्स कॉर्नरची खरी ओळख असलेल्या पट्टी समोशाच्या निर्मितीला सुरुवात होते. प्रसिद्ध पदार्थ मोठय़ा प्रमाणावर बनला की त्याचे महत्त्व कमी होते असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे पट्टी समोसा हा दिवसातून सकाळी ११ ते २ आणि सायंकाळी ५ ते ७ असे फक्त पाच तास उपलब्ध असतो. त्यामुळे या वेळेत येथे मोठय़ा प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. ‘‘आमच्या एका नातेवाईकाकडून मी हा पदार्थ बनवायला शिकलो. त्यानंतर एकदा वाडा तालुक्यात गेलो असताना प्रवासात पट्टी समोसा पाहण्यात आला. त्यानंतर आपणही असाच समोसा तयार करू असे मनाशी पक्के करत शिवप्रेरणा स्नॅक्स कॉर्नरची सुरुवात केली,’’ असे राजेंद्र पातकर सांगतात. ‘‘आम्ही दिवसाला अवघ्या पाच तासांत जवळपास हजार पट्टी समोसे तयार करत असतो.

बहुतेकदा हे समोसे वेळेपूर्वीच संपलेले असतात. समोसे घेण्यासाठी इथे नेहमीच खवय्यांची झुंबड उडालेली असते. या समोशासोबत तिखट, हिरवी, गोड आणि सुकी चटणी दिली जाते. त्यामुळे स्नॅक्स कॉर्नरसमोर उभे राहून खाण्याबरोबरच अनेक जण समोसे घरी नेऊन खाणे पसंत करतात. अनेकांच्या घरात संध्याकाळी नाश्त्याला आमचा पट्टी समोसा असतो, याचा आम्हाला अभिमान असल्याचे पातकर सांगतात. येथील समोसा अवघ्या आठ रुपयाला मिळत असल्याने अनेक जण दोन ते चार समोसे एका वेळी खाणे पसंत करतात. सायंकाळी सातनंतरही मोठय़ा प्रमाणावर समोसा घेण्यासाठी येथे ग्राहक येत असतात. मात्र हजार समोशांचा कोटा पूर्ण झाला की पातकर काम थांबवितात. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने त्यांनी त्यांचा हा उद्योग मर्यादित ठेवला आहे. सध्या पातकरांना त्यांच्या या व्यवसायात त्यांची पत्नी शीतल आणि आणखी एक सहकारी त्यांना कामात मदत करतात. केवळ व्यवसाय वाढवावा म्हणून इतर पदार्थ बनवण्याची इच्छा नाही. पट्टी समोसा ही आमची ओळख आणि वैशिष्टय़ असल्याने यापुढेही तीच ओळख कायम ठेवणार, असे पातकर सांगतात. या समोशाची लोकप्रियता बदलापूरसह अंबरनाथ, उल्हासनगर आणि आसपासच्या शहरांमध्येही पोहोचली आहे. बदलापुरात कामानिमित्त येणारे अनेक जण नियमितपणे येथे नक्की भेट देत असतात. तसेच दररोजचे ग्राहकही ठरलेले आहेत. अनेकदा परगावी जाताना येथील पट्टी समोसे सोबत घेऊन जाणारेही बरेच आहेत.

शिवप्रेरणा स्नॅक्स कॉर्नर

  • कुठे? डीजीवन शॉपसमोर, बेलवली, बदलापूर (पश्चिम)
  • कधी:- सकाळी ९ ते ११. संध्याकाळी ५ ते ७.