रहिवाशाचे पालिका आयुक्तांना निवेदन
कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटविण्यात आले आहेत. या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे आतापासूनच कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसर मोकळा दिसू लागला आहे. झुंझारराव बाजार, शिवाजी चौक परिसरातील पादचाऱ्यांची गर्दी आणखी कमी करण्यासाठी मागील सात वर्षांपासून रखडलेला हॉटेल गुरुदेव ते शिवाजी चौक हा स्कायवॉकचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्याची मागणी आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे केली आहे.
कल्याण पश्चिम भागात सात वर्षांपूर्वी स्कायवॉक उभारणीचे काम सुरू करण्यात आले. त्या आराखडय़ात कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक, महालक्ष्मी हॉटेल, झुंझारराव बाजार ते गुरुदेव हॉटेल असा स्कायवॉकचा मार्ग प्रस्तावित होता. हा स्कायवॉक गुरुदेव हॉटेल ते शिवाजी चौकापर्यंत विस्तारण्याचे काम सुरू केले तर या भागातील एका व्यावसायिकाच्या व्यवसायाला स्कायवॉकचा अडथळा येत होता. त्यामुळे स्कायवॉक गुरुदेव हॉटेलपर्यंत येऊ न देता तो तत्पूर्वीच सिद्धिविनायक संकुल येथे उतरविण्यात आल्याची चर्चा होती. तसेच या प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा आराखडय़ातून रद्द करून टाकला, अशी माहिती मनोज कुलकर्णी या रहिवाशाने आयुक्तांना दिली आहे.
सिद्धिविनायक संकुल येथे उतरविण्यात आलेल्या स्कायवॉक जिन्याचा पादचारी अजिबात वापर करीत नाहीत. या जिन्यांवर सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत प्रेमी युगुले रस्ता अडवून उभी असतात, असे तक्रारीत म्हटले आहे. याउलट, सिद्धिविनायक संकुल (गुरुदेव हॉटेल) ते शिवाजी चौक हा रखडलेला स्कायवॉकचा टप्पा पूर्ण केला तर फायदा होईल. स्कायवॉकचे काम तातडीने हाती घेण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.