शिवतीर्थ,गोपी मॉलजवळ, विष्णूनगर, डोंबिवली पश्चिम

सर्वसाधारणपणे जुन्या इमारतींची बांधकामे जशी भक्कम, तशीच तिथे राहणाऱ्या रहिवाशांमधील परस्पर जिव्हाळ्याचे ऋणानुबंध घट्ट असतात. डोंबिवली पश्चिम विभागातील ‘शिवतीर्थ’ सोसायटी त्यापैकी एक.

[jwplayer ABBOOhmF]

साधारण पन्नास वर्षांपूर्वी डोंबिवली हे शांत, रमणीय गाव होते. पश्चिम विभागात तर लोक शेती करीत होते. लोकवस्तीही तुरळक होती. बैठी घरे, घरासमोर अंगण, त्यात गाई-म्हशींचा वावर होता. सुभाष रोड, मच्छीमार्केट या काही जुन्या ओळखीच्या खुणा आहेत. नाना शंकर शेठ चौकाजवळील ‘शिवतीर्थ’ ही वसाहतही त्याच काळातील. नवरे यांच्या जमिनींपैकी सव्वा एकर जागेत ‘शिवतीर्थ’ उभारण्यात आली आहे.

शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्ती डी. व्ही. पंडित यांचे मामा दर्गे यांनी निवासी संकुल उभारण्याची संकल्पना मांडली. त्यासाठी त्यांनी काही विश्वासू मित्रमंडळींना एकत्र करून गृहनिर्माण सोसायटी स्थापन केली. नाना शंकर शेठ चौकाजवळील ही जमीन सर्वाच्या पसंतीस पडली. निधी जमा करून ही जमीन विकत घेतली. त्यानंतर सोसायटीनेच वास्तुविशारद आणि कंत्राटदार नेमून तळ अधिक दोन मजल्यांच्या सहा इमारती बांधल्या. नागेश, दुर्गेश, शैलेश, महेश, मंगेश आणि योगेश अशा भगवान शंकराच्या विविध नावांनी उभारलेल्या या ‘शिवतीर्थ’संकुलात ८९ सदनिका आहेत.

‘गोपी’तला पहिला सिनेमा 

१९६० मध्ये हा परिसर पूर्णपणे मोकळा होता. ‘शिवतीर्थ’ संकुलाच्या जवळच ‘गोपी’ सिनेमागृह होते. तेही साधारण ‘शिवतीर्थ’ संकुलाच्या उभारणीच्या काही कालावधी आधी बांधण्यात आले होते. त्यावेळी मनोरंजनाचे साधन म्हणून ‘गोपी’ सिनेमागृहाचे मोठय़ा प्रमाणात स्वागत झाले.त्या वेळी   सुपरस्टार राजेश खन्ना याच्या ‘हाथी मेरे साथी’ने ‘गोपी’ची सुरुवात झाली. तो चित्रपट पाहिल्याची आठवण ‘शिवतीर्थ’चे अध्यक्ष अरुण जोशी यांनी सांगितली.

आरक्षणामुळे पुनर्विकासाला अडथळा

संकुलात तशी मोठय़ा प्रमाणात मोकळी जागा आहे. त्यामुळे वाहनतळाचा प्रश्न कधीच उद्भवला नाही. मात्र या मोकळ्या जागेवर पालिकेने आरक्षण टाकल्याने आता इमारतीच्या पुनर्विकासात अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे हे आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न सोसायटीच्या वतीने सुरू आहेत. इमारती अद्याप भक्कम असल्या तरी वेळेत पुनर्विकास व्हायला हवा, अशी रहिवाशांची भावना आहे.

गडय़ा आपुली सोसायटी बरी

अर्धशतकाच्या कालावधीत त्यांची तिसरी पिढी येथे सुखाने संसार करीत आहे. काही कुटुंबातील नव्या पिढीने अन्यत्र घरे घेतली आहेत. मात्र त्यांचे आई-वडील इथेच राहतात. दुसरीकडे अधिक सुविधा असतीलही, पण इतक्या वर्षांचा लागलेला जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, माणुसकी इतरत्र मिळणार नाही, अशी त्यांची धारणा आहे.

कार्यकारिणीत महिलांना प्राधान्य

सोसायटीच्या कार्यकारिणीत महिलांना कार्य करण्याची संधी दिली. त्यांनीही त्या संधीचे सोने केले. त्यांनी परिसर स्वच्छतेवर अधिक भर दिला. इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले. जिथे दुरुस्ती करणे आवश्यक आहे, तिथे ती करून घेतली, अशी माहिती अपूर्वा काळे यांनी दिली.

८० वृक्षांची सावली

हिरवी वनराई हे या सोसायटीचे आणखी एक वैशिष्टय़. संकुल परिसरात तब्बल ८० वृक्ष आहेत. त्यामुळे घनदाट सावली, शुद्ध हवा मिळते. ऋतुनुसार फळे आणि फुलेही मिळतात.

 

सर्व सुविधा हाकेच्या अंतरावर

बाजारपेठ, मॉल, उपाहारगृह, उद्यान, सिनेमागृहे आदी मनोरंजनाच्या सुविधा, रुग्णालये, दवाखाने, शाळा, महाविद्यालये, वाहन व्यवस्था आदी यापूर्वी नसलेल्या सुविधा आता संकुलाजवळ आल्या आहेत. वाहनतळासाठी भरपूर मोकळी जागा आहे. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मैदान उपलब्ध आहे. तिथे वर्षभरातील सण-उत्सव साजरे होतातच, शिवाय साखरपुडा, विवाह सोहळा, वाढदिवस, स्नेहसंमेलनाचे कार्यक्रमही उत्साहात पार पडतात.

सुहास धुरी suhas.dhuri@expressindia.com

[jwplayer siBod4cy]