ठाणे शहरात नव्याने सुरू झालेल्या प्रीपेड रिक्षा योजनेच्या संगणक प्रणालीत जवळच्या टप्प्यांसाठी रिक्षा भाडय़ाची नोंद होत नसल्याने ठरावीक टप्प्यानुसारच प्रवाशांना भाडे भरावे लागत असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. सध्याच्या प्रणालीत दोन आणि त्यापुढील टप्प्यांकरिता रिक्षाभाडे ठरविण्यात आले आहे. मात्र, शहरातील काही ठिकाणे ठरविलेल्या अंतरापेक्षा जवळच्या अंतरावर आहेत. अशा जवळच्या अंतराकरिता प्रवाशांना प्री-पेड योजनेत ठरविलेल्या टप्प्यानुसारच पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे जवळच्या अंतराकरिता प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजावे लागू नयेत यासाठी संगणक प्रणालीत आठवडय़ाभरात दुरुस्ती करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
ठाणे शहरातील महिलांचा प्रवास अधिक सुखकर व सुरक्षित व्हावा या उद्देशाने ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने प्रीपेड रिक्षांची योजना सुरू केली आहे. सद्य:स्थितीत विजू नाटेकर या ठाण्यात एकमेव रिक्षा युनियनमार्फत ही योजना राबविण्यात येत असून एक मेपासून प्रवाशांना प्रीपेड रिक्षांचे दालन खुले करण्यात आले आहे. या योजनेकरिता संघटनेने दरपत्रकही घोषित केले आहे. त्यानुसार कमीतकमी दोन किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी २७ रुपये, २ ते ४ किमीपर्यंतच्या प्रवासासाठी ५४ रुपये तर ४ ते ६ किमीर्पयच्या प्रवासाकरिता ८२ रुपये, असे प्रवासी भाडय़ाचे टप्पे ठरविण्यात आले आहे. मात्र, दोन किमीपेक्षा कमी अंतराकरिता प्रवासी दर ठरविण्यात आला नसल्याने त्यापेक्षा कमी अंतराकरिता प्रवाशांना ठरलेल्या दराप्रमाणेच पैसे भरावे लागतात. त्यामुळे जवळच्या अंतराकरिता दर ठरविण्याची मागणी प्रवाशांमधून पुढे आली आहे. हे लक्षात घेऊन विजू नाटेकर युनियनने जवळच्या अंतराकरिता दर ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात युनियनचे अध्यक्ष भाई टिळवे म्हणाले,‘ प्रीपेड रिक्षा योजनेच्या संगणक प्रणालीमध्ये जवळच्या अंतराकरिता किती पैसे घ्यायचे, ही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना जास्त पैसे भरावे लागत आहेत. त्यामुळे संगणक प्रणालीत सुधारणा करण्यात येईल.’

ठाण्यात प्रवाशांकरिता मीटर, शेअर आणि प्रीपेड असे तिन्ही पर्याय खुले आहेत. प्रीपेड रिक्षाचा प्रवास सुरक्षित आहे. ही योजना महाग असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या योजनेकरिता कर्मचाऱ्यांचा तसेच अन्य खर्च आहे. ठरावीक भाडे आकारण्यात येत असल्याने रिक्षाचालकांना उलट कमी पैसे मिळतात. तसेच वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर रिक्षाभाडे वाढते. प्रीपेड रिक्षाच्या ठरावीक भाडय़ामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे.
– भाई टिळवे, विजू नाटेकर युनियनचे अध्यक्ष