संध्याकाळच्या चटपटीत खाण्यांमध्ये आता कमालीचे वैविध्य दिसत असले तरी पाहताक्षणीच तोंडाला पाणी सुटणाऱ्या पाणी पुरीला तोड नाही. प्रत्येक शहरात पाणी पुरीचे काही खास अड्डे असतात आणि खवैय्यांना त्यांचा ठावठिकाणा माहिती असते. चप्पट किंवा फुगीर गोल पुऱ्यांमध्ये निरनिराळ्या स्वादांचे पाणी भरून मिटक्या मारीत खाणारी तरुणाई, असे दृश्य जागोजागी पहायला मिळते. डोंबिवलीतील ‘श्री विनायक’ स्टॉल वैविध्यपूर्ण चवींसाठी प्रसिद्ध आहे. इथे हजमा हजम, लिंबु, पुदीना अशा विविध चवीचे पाणी असलेली पाणी-पुरी मिळते. येथील पाणी पुरीची चटक लागलेली खवैय्ये मंडळी संध्याकाळच्या वेळी इथे रेंगाळताना दिसते. पाणीपुरीसोबत इथे भेळपुरी, शेवपुरी आदी पदार्थही मिळतात. काहीजण आधी शेवपुरी-भेळ खाऊन खाद्य मैफलीची इतिश्री पाणीपुरीने करतात, तर काही सुरुवातच पाणीपुरीपासून करतात.

डोंबिवलीतील ‘श्री विनायक’ स्टॉलवर स्वच्छता आणि शुद्धतेची हमी असल्याने खवैय्ये अगदी निश्चिंत मनाने इथे पाणीपुरी खातात. काही ठिकाणी पुरीतील पाणी कोमट असते, पण इथे मात्र थंड पाणी दिले जाते. त्यामध्ये पुदिना, लिंबू, हजमाहजम, जीरा, जीरा-लसूण आणि रेग्युलर अशा एकूण सहा प्रकारात येथे पाणीपुरी उपलब्ध आहे. पुदिना वाटून त्यात थोडा गूळ आणि हिरवी मिरची चवीप्रमाणे वाटली जाते. लिंबूमध्ये दहा मोठय़ा आकाराचे लिंबू पिळून हे पाणी तयार केले जाते. हजमाहजम या प्रकारात थोडासा हाजमोला मसाला आणि आंबट गोड चव येण्यासाठी चिंच आणि गुळाचा वापर केला जातो. जिरा, लसूण यांमध्ये जिरे आणि लसूण वाटून घातले जाते. जिरा-लसूण आलेले हे पाणी पोटासाठीही चांगले असल्याचे मालक मोहन गुजर यांनी सांगितले. तसेच पाणीपुरीचे रेग्युलर पाणीही येथे मिळते. या पाण्यामुळे कोणताही त्रास होऊ नये, यासाठी शुद्ध पाण्याचा वापर केला जातो. दर दिवशी प्रत्येक प्रकाराचे दहा लिटर पाणी तयार केले जाते. या पाणीपुरीमध्ये उकडलेला बटाटा, उकडलेला हरभरा आणि बुंदीचा वापर होतो. येथील पाणीपुरी खाण्यासाठी डोंबिवलीच्या विविध भागातून खवैय्ये इथे येतात. पाणीपुरीचा हा प्रकार गुजरातमधून इथे आला असल्याचे मोहन गुजर यांनी सांगितले. प्रत्येक चवीची एक पाणीपुरी खवय्ये खाऊन बघतात. त्यानंतर ज्या पाण्याची चव अधिक आवडते, त्या पाण्याची फर्माईश होते. याशिवाय शेवपुरी-भेळपुरीवर डाळिंबांच्या दाण्यांची सजावट केली जाते. त्यामुळे येथे येणारे खवय्ये जिभेच्या चोचल्यांबरोबर पौष्टिकतेचाही आस्वाद घेऊ शकतात.

स्वादिष्ट फालुदाही विशेष आकर्षण

येथे मिळणारा फालुदाही खवय्यांच्या विशेष आवडीचा आहे. त्यात टाकण्यासाठी आरारोटपासून दहा किलो शेव दररोज बनवली जाते. बदामशेक टाकून हा फालुदा बनविला जातो. तसेच ‘राजभोग’ हे विशेष आईसक्रीम या फालुद्यामध्ये टाकले जाते. अमेरिकन ड्रायफ्रुट, केशरपिस्ता, बदाम पिस्ता, राजवाडी, राजभोग आदी आईसक्रीमही इथे तयार केले जातात. येथे मिळणारा बदामशेकही अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. या बदामशेकमध्ये जाड आटवलेले दूध आणि वाटलेल्या बदामाची पावडर टाकली जाते. या जाडसर बदामशेकमध्ये बदाम पिस्ता किंवा अमेरिकन ड्रायफ्रूट आईसक्रीम टाकले जाते. त्यावर सजावटीसाठी बदाम, काजू, मनुके टाकले जातात. त्यामुळे हा बदामशेक पौष्टिक आहे. ज्या खवय्यांना काजू बदाम खाणे आवडत नाही, त्यांनी हा बदामशेक प्यायला तरी त्यात काय टाकले आहे, याची किंचितही कल्पना येत नाही.

श्री विनायकस्टॉल

  • कुठे? शॉप.न. ४, मंजूश्री बिल्डिंग, इंडियन बँकेच्या बाजूला, रेमंण्ड शोरूम समोर,मानपाडा रोड, डोंबिवली.