भाजपमधील अंतर्गत राजकारण टोकाला; ओमी कलानी, सुधाकर चव्हाण यांच्यासाठी रवींद्र चव्हाण आग्रही

महापालिका निवडणुकांच्या अगदी शेवटच्या क्षणी ठाणे, उल्हासनगरमधील कलंकित नेत्यांना पक्षप्रवेश देण्याच्या हालचाली भाजपच्या वर्तुळात सुरू झाल्या आहेत. हे प्रवेश थांबावेत यासाठी दुसऱ्या गटाकडून स्वाक्षरी मोहीम आणि दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. उल्हासनगरात ओमी कलानी, ठाण्यात सुधाकर चव्हाण या वादग्रस्त नेत्यांना प्रवेश मिळावा यासाठी भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण जास्तच आग्रही आहेत. पक्षश्रेष्ठीही या आग्रहाला खतपाणी घालत असल्याचे स्पष्ट झाल्याने पक्षातील जुन्या गटाने नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबवीत थेट मुख्यमंत्र्यांकडे निवेदन रवाना करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कलंकित नेत्यांच्या प्रवेशावरून पक्षांतर्गत मतभेद उघड झाल्याचे चित्र आहे.

Modi, religious polarization, Marathwada,
‘रजाकारी’ला उजाळा देत मराठवाड्यात मोदींचा धार्मिक ध्रुवीकरणावर भर
Jan Vikas Foundation supports Dr Prashant Padole of Congress
भंडारा : जनविकास फाऊंडेशनचा काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळेंना पाठिंबा, माजी आमदार चरण वाघमारेंची भूमिका स्पष्ट
congress
सांगलीत मैत्रीपूर्ण लढत की माघार ? दिल्लीच्या निर्णयाची काँग्रेस नेत्यांना प्रतीक्षा
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप

ठाणे आणि उल्हासनगर महापालिकेत भाजपच्या तुलनेत शिवसेनेची ताकद मोठी आहे. हे लक्षात घेऊन भाजपने परपक्षातील नाराजांना गळाला लावण्याची मोहीम काही दिवसांपासून सुरू केली आहे. उल्हासनगर महापालिकेत राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांसोबत एकटय़ाने लढण्याची कुवत पक्षात नाही, असे भाजपमधील एका गटाला वाटू लागले आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत युती तोडायची झाल्यास राष्ट्रवादीतील ज्योती आणि ओमी या कलानी आई आणि मुलास प्रवेश देण्याशिवाय पर्याय नाही, असा युक्तिवाद पक्षातील एका गटाने मुख्यमंत्र्यांपुढे मांडला आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण काही महिन्यांपासून यासाठी जोरदार प्रयत्नात आहेत. ओमी यांच्याविरोधात असलेल्या तक्रारी मागे घेण्याची खेळीही यानिमित्ताने करण्यात आली आहे. ओमी यांचा पक्षात प्रवेश झाल्यास उल्हासनगर महापालिकेत भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होईल, असा दावा चव्हाण यांच्या गटाकडून केला जात आहे. दरम्यान ठाण्यातही अशाच काही वादग्रस्त नेत्यांना पक्षप्रवेश देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

ठाण्यातील ‘महाराज’ही वादात

राज्यात भाजपची सत्ता स्थापन होताच महाराज या टोपणनावाने ओळखला जाणारा एका माथाडी नेत्यास पक्षात प्रवेश देऊन थेट राज्य कार्यकारिणीवर नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. खून, खंडणी यांसारखे गंभीर गुन्ह्य़ात एके काळी आरोपी असलेला हा नेता राज्यातील एका बडय़ा मंत्र्याचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपने या महाराजाची सेना शिवसैनिकांना धडा शिकविण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी उतरविली होती. ठाणे निवडणुकीच्या तोंडावर हा नेता भलताच सक्रिय झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून शिवसेनेतील काही दबंग नेत्यांविरोधात येथेही महाराज सेना उतरविण्याचे बेत भाजपकडून आखले जात आहेत.

दरम्यान, कलानी यांच्याप्रमाणे शिवाईनगर परिसरात दबदबा राखून असणारे वादग्रस्त नेते सुधाकर चव्हाण यांना अखेरच्या क्षणी पक्षप्रवेश देण्याची तयारी भाजपने सुरू केली असून त्यासंबंधी जोरदार वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. चव्हाण यांना थेट प्रवेश देणे जमले नाही तर त्यांच्या काही उमेदवारांना उमेदवारी देऊन निवडणुकीनंतर चव्हाण यांच्या प्रवेशाचा मार्ग खुला करता येईल का याचीही चाचपणी केली जात आहे. दरम्यान, या वादग्रस्त नेत्यांना प्रवेश देऊ नये यासाठी पक्षातील दुसरा गटही सक्रिय झाला असून नागरिक तसेच जुन्या पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी मोहीम राबवून प्रवेशास खोडा बसेल, असे प्रयत्न केले जात आहेत.

‘माझ्याही कानावर आले आहे’

ठाणे आणि उल्हासनगरात अशा स्वरूपाच्या स्वाक्षरी मोहिमा सुरू आहेत का, यासंबंधी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी माझ्याही कानावर असेच काही आले आहे, असे ते म्हणाले. वादग्रस्त नेत्यांना प्रवेश देताना त्या त्या भागातील जुन्या नेत्यांचे म्हणणे ऐकायला हवे, अशी भावना यानिमित्त व्यक्त होत असावी, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.