बेकायदा बांधकामांची उभारणी आणि त्यांचे संरक्षण केल्याप्रकरणी नगरसेवकपद रद्द करण्याच्या नोटिसा बजावलेल्या सहा नगरसेवकांवरील कारवाई अंतिम टप्प्यात आली आहे. या नगरसेवकांकडून मागविण्यात आलेले खुलासे वस्तुस्थितिदर्शक नसल्याने ते अमान्य करून या नगरसेवकांची पदे रद्द करण्याच्या निष्कर्षांप्रत प्रशासन आले आहे, असे विश्वसनीय पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

बेकायदा बांधकाम उभारणी, संरक्षण केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी, विद्याधर भोईर, वामन म्हात्रे, कविता म्हात्रे, बुधाराम सरनोबत आणि काँग्रेसचे सचिन पोटे यांना पालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी नगरसेवकपद रद्द (अनर्ह) करण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. या नगरसेवकांचे खुलासे प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. या खुलाशांची सत्यता पडताळणीनंतर ते वस्तुस्थितीला धरून नसल्याचे प्रशासनाचे मत झाले आहे. कारवाईच्या रांगेत असलेल्या पाच नगरसेवकांचे खुलासे अमान्य करून त्यांची पदे रद्द करण्याची तयारी प्रशासनाने चालवली आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाली तर नगरसेवकांना पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढविणे शक्य होणार नाही. याव्यतिरिक्त सर्व पक्षांमधील एकूण सात नगरसेवकांच्या बेकायदा बांधकामांसंबंधी नस्तींची छाननी सुरू असून, अल्पावधीत त्यांनाही नगरसेवकपद रद्द करण्याच्या नोटिसा बजावण्यात येणार आहेत, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.