नववर्ष स्वागत यात्रेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याने मध्यंतरी कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना वेग आला होता. मुख्यमंत्र्यांचा ताफा ज्या मार्गाने येणार तेथील रस्त्यांची कामे घाईघाईत उरकण्यात आली होती. मात्र या दौऱ्यानंतर प्रलंबित असलेली कामे पुन्हा कासवगतीने सुरू असून या अर्धवट कामांमुळे रहिवाशांकडून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. उन्हाचे चटके जाणवू लागले असताना अर्धवट कामांमधून उडणाऱ्या धुरळ्यामुळे पादचाऱ्यांचे अक्षरश: हाल सुरू असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
शहरातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे गणेश मंदिर येथील पथ व फडके रोडवरील कामे तर अवघ्या दहा-पंधरा दिवसांत उरकण्यात आली. घरडा सर्कल ते शेलार नाका परिसरात रस्त्याच्या मधोमध वृक्षारोपणही करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा दौरा आटोपताच प्रलंबित रस्त्यांची कामे पुन्हा एकदा कासवगतीने सुरू असल्याचे चित्र दिसू लागले आहे. सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम झाले असले तरी रस्त्याच्या दुतर्फा सिमेंट, वाळू, खडी, पेव्हर ब्लॉकच्या लाद्यांचा खच पडलेला आहे. ज्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवून झाले आहेत तेथील सिमेंट आणि मातीचा थर रस्त्यावर तसाच पडून आहे. काँक्रीटच्या रस्तेकामावर पुरेसे पाणी मारले जात नसल्याने वाहनांमुळे हा धुरळा हवेत उडतो. सिमेंट-मातीच्या धुरळ्यामुळे नागरिकांना तोंडाला रुमाल लावूनच रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. या ढिगाऱ्यांमुळे रस्त्याच्या बाजूने चालणे जिकिरीचे बनू लागले आहे. दुचाकीस्वारांनाही याचा फटका बसत आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी ही कामे वेगाने उरकली जावीत, यासाठी आग्रही असणाऱ्या स्थानिक राजकीय नेत्यांनी अळीमिळी गुपचिळी धारण केली असून यामुळे रहिवाशांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे येत्या ३१ मेपूर्वी पूर्ण केली जातील, असा दावा अभियांत्रिकी विभागामार्फत केला जात आहे.