पारसिक डोंगरावरील अतिक्रमणांमुळे मोठय़ा दुर्घटनेची भीती

मुंब्रा परिसरातील पारसिक डोंगररांगांवर दिवसागणिक झोपडपट्टय़ांचे अतिक्रमण वाढू लागल्यामुळे या भागात माळीणसारख्या मोठय़ा दुर्घटनेच्या पुनरावृत्तीचा धोका निर्माण झाला आहे. हा डोंगरभाग अत्यंत ठिसूळ असून या भागात वारंवार दरड कोसळ्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी पहाटे या भागात दरड कोसळून मुंब्रा बाह्य़वळण रस्त्यावरील वाहतुकीला फटका बसला. गेल्या तीन महिन्यांमध्ये या भागात सहापेक्षा अधिक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पर्यावरणतज्ञांकडून हा एकप्रकारे धोक्याचा इशारा मानला जात असून, असे असताना डोंगरांवर झोपडय़ांच्या वाढत्या अतिक्रमणाकडे वन विभागाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

वन विभागाने या ठिकाणी केवळ फलक उभारून धोक्याची सूचना दिली असून येथील अपघातांची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे डोंगरावरील अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढीस लागली असून हे चित्र असेच राहिल्यास पुढील काही वर्षांत येथील संपूर्ण डोंगराला        झोपडय़ांचा विळखा बसण्याची शक्यता आहे. या डोंगरांच्या खालून मुंब्रा वळणरस्ता काढण्यात आला आहे. तेथून दररोज शेकडोंच्या संख्येने वाहनांची येजा सुरू असते. त्यामुळे या भागात दरड कोसळल्यास माळीणपेक्षाही मोठी दुर्घटना घडण्याची भीती वर्तवली जात आहे.

मुंब्रा शहराकडून डोंगरमाथ्याच्या दिशेने झोपडय़ांची अतिक्रमणे वाढू लागली आहेत. प्रत्येक दिवशी नव्या झोपडय़ा या भागात उभ्या राहत असून त्यासाठी झाडांची मोठी कत्तलही केली जात आहे. विशेष म्हणजे हा भाग अत्यंत ठिसूळ असल्यामुळे या डोंगररांगांवर दरड कोसळण्याचा धोका संभवतो, अशी कबुली वन विभागानेही दिली आहे.

मात्र, येथील अतिक्रमणांवर नियंत्रण आणणे प्रशासनाला अद्याप शक्य झालेले नाही. बाह्य़वळण रस्त्याच्या डाव्या बाजूला (खालच्या भागात) असलेल्या झोपडय़ा आता थेट रस्त्याच्या वरील उजव्या बाजूला (वरील भागात) डोंगरावरही वसविल्या जात आहेत.

वनविभागाच्या क्षेत्रात होणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करण्याची गरज असताना वन विभागाने या भागात एक फलक लावून या भागात दरड कोसळण्याची शक्यता व्यक्त करून अपघाताची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप पर्यावरण प्रेमींमधून केला जात आहे.

रस्ते अपघातांत झोपडय़ातील बळी..

रविवारी पहाटे मुंब्रा बायपास रस्त्यावरून कलंडलेला ट्रक एका रस्त्याच्या बाजूच्या उतारावरील झोपडीवर कोसळून दोन कुमारवयीन मुली त्यात जखमी झाल्या. खड्डय़ांमुळे रस्त्याची दुरवस्था, दुभाजकांचा अभाव, रस्त्याच्याकडेला सुरक्षा भिंत नसल्याने मुंब्रा बाह्यवळण मार्गावर अपघात घडत असून त्यामुळे येथे जीवितहानी होण्याचे प्रकार वाढले आहेत.

मुंब्रा परिसरातील घटना

२१ जून – पारसिक बोगदा परिसरातील उदयनगर येथे रस्ता खचला. मध्य रेल्वेची वाहतूक बंद.

२५ जून – मुंब्रा बाह्य़वळण रस्त्यावर रेहमानिया रुग्णालयाजवळ दरड कोसळली.

३ जुलै – मुंब्रा येथील जुना गवळी पाडा परिसरातील शंकर मंदिराच्या मागे दरड कोसळून दोन घरांचे नुकसान.

१५ जुलै – गुजराथी कॉलनीजवळ जमीन खचल्याने एका घराची पडझड.

१७ जुलै –  गुजराथी कॉलनीजवळ डोंगरावरील जमीन खचल्याने घराची पडझड.

३० ऑगस्ट – मुंब्रा बाह्य़वळण रस्त्यावर रेहमानिया रुग्णालयाजवळ ट्रेलरवर दरड कोसळली.