थंडीचे दिवस सरून उन्हाळा सुरू झाला आहे. तळपत्या उन्हात घामाच्या धारांनी शरीराची काहिली होत असताना थंडगार फळाचा रस मिळाला तर काय बहार येईल आणि हा फळांचा रस आरोग्याची काळजी घेणारा असेल तर सोन्याहून पिवळे! तुम्ही स्वत:च्या आरोग्याविषयी जागरूक असाल तर मीरा रोड येथील ‘स्लश’ या ज्युस बारमध्ये मिळणाऱ्या फळांच्या विविध प्रकारच्या आरोग्यदायी रसाचा आस्वाद जरूर घ्यायला हवा.

गोल्डन नेस्ट ते काशिमीरा या मुख्य रस्त्यावरील जुन्या पेट्रोल पंपासमोर सुमारे वर्षभरापूर्वीच स्लश हा ज्युस बार सुरू झाला आहे. सूरज भालसिंग या तरुणाने हा ज्युस बार सुरू केला आहे. सूरजने अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे; परंतु हॉटेल व्यवसायाची असलेली ओढ तसेच विविध प्रकारची पेये बनविण्याची आवड सूरजला स्वस्थ बसू देईना. म्हणूनच पुण्यातील नोकरीवर पाणी सोडून त्याने मीरा रोडला स्वत:चा ज्युस बार थाटला.

फळांचे गुणधर्म, त्यांचा मानवी शरीराला असलेला नेमका उपयोग आणि त्यात असलेल्या कॅलरीज यांचा बारकाईने अभ्यास करून सूरजने बनवली स्वत:ची फळांच्या रसांची अनोखी मिश्रणे. ही मिश्रणे तयार करताना शरीराच्या तंदुरुस्तीचा काळजीपूर्वक विचार केला असून आरोग्याच्या बाबतीत जागरूक असणाऱ्यांसाठी ती अतिशय उपयुक्त आहेत. प्रत्येक फळाचा स्वतंत्र रस हा सगळीकडे मिळतो; परंतु स्लशमध्ये मिळणारी एकापेक्षा अधिक फळांचे रस एकत्र करून तयार केलेली मिश्रणे आगळीवेगळी आहेत. त्याला सूरज याने दिलेली नावेही तितकीच आकर्षक आहेत. स्मुदीज नावाचे फळांचे रस आणि व्हॅनिला असे दाट मिश्रण, यात थोडय़ा कॅलरीज जास्त आहेत. मात्र कॅलरीज कमी हव्या असतील तर ‘लो फॅट स्मुदीज’ हा रसदेखील इथे उपलब्ध आहे. फळांमध्ये असलेल्या कॅलरीजचा विचार करून तयार केलेले कॉम्बिनेशन ऑफ ज्युसेस, अतिथंड पेय पिण्याची सवय असणाऱ्यांसाठी आइस स्लश आणि ज्युस कुलर्स, ज्युस फ्लोटर्स, बोट अव्हेलँच, फ्रीक शेक असे इतर कुठेही न मिळणारे फळांच्या रसाचे विविध प्रकार ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. शिवाय ऊर्जा आणि स्फूर्तिवर्धक एनर्जी बूस्टर्स, केवळ मनोरंजन म्हणून तोंडातून धूर सोडणारे स्मोक कँडी, फळांपासून बनवलेली टब्स अँड प्लॅटर, डेथ बाय चॉकलेट, डेथ बाय ग्रिल अशी लहान मुलांपासून तरुणांपर्यंत तसेच प्रौढांपासून ते वयस्कांपर्यंत सर्व वयोगटांतील ग्राहकांची आवडनिवड लक्षात घेऊन रसांची मिश्रणे आणि पदार्थ या ठिकाणी ताज्या स्वरूपात उपलब्ध आहेत.

व्यवसाय आणि ग्राहकांच्या आरोग्याचे हित अशी सांगड घातलेल्या या ज्युस बारमध्ये ग्राहकांनी विनंती केली तर आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना मानवेल असा आहारसल्लाही दिला जातो. फळांच्या आरोग्यदायी रसांसोबतच आजच्या पिढीला आवडणारे पिझ्झा, सँडविच असे पदार्थही या बारमध्ये उपलब्ध आहेत. आजची तरुणाई आपले वाढदिवस जंक फुड खाऊन साजरे करत असते. यासाठी ‘वाढदिवस साजरा करा आरोग्य राखून’ अशी खास ऑफर ‘स्लश’कडून देण्यात येते. त्यामुळे आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याचे रक्षण करण्यासाठी  तरी स्लशला जरूर भेट द्यावी.

स्लश

  • पत्ता : शॉप क्र. ७, ओसवाल किरण, मीरा भाईंदर रोड, जुन्या पेट्रोल पंपसमोर, मीरा रोड (पूर्व)
  • वेळ : दुपारी १.३० ते रात्री १२
  • संपर्क : ९७६८२५५२७७