अंबरनाथमधील खेर विभागात भाज्यांच्या जुडीने शेजारधर्माचे बंध अधिक घट्ट होत आहेत. पूर्वेकडील खेर विभागात गेल्या १३ वर्षांपासून केवळ परिसरातील नागरिकांच्या आठवडय़ाच्या भाजीची सोय व्हावी व त्यानिमित्ताने एकत्र जमण्याचा
योग यावा; या हेतूने हेरंब रहिवासी संघातील नागरिक हा उपक्रम राबवतात. ही मंडळी दर शनिवारी भाजीची यादी परिसरातील नागरिकांकडून घेऊन रविवारी कल्याण भाजी मंडईतून सगळ्यांच्या भाज्या यादीप्रमाणे आणतात. १३ वर्षांपासून ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर चाललेला भाजी आणण्याचा हा उपक्रम येथील नागरिकांना भाजीच्या जुडीप्रमाणे एकमेकांमध्ये बांधून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. अंबरनाथमधील खेर विभागात राहणाऱ्या नागरिकांनी २००१ मध्ये येथील हेरंब गणपती मंदिराच्या नावावरून हेरंब रहिवासी संघाची स्थापना केली. पूर्वी चाळ संस्कृतीमध्ये एकत्र राहणारी ही मंडळी ब्लॉक संस्कृतीमध्ये गेल्यावर संपर्क कमी झाल्याची खंत एकमेकांमध्ये व्यक्त करत असत. त्यामुळे एकत्र येण्याच्या निमित्ताने रत्नाकर चांदसरकर, सुरेश अय्यर, शैलेश बालन, नंदू राठी आदींनी हा निर्णय घेतला.

१३ वर्षांच्या सेवेला उत्तम प्रतिसाद
१४ फेब्रुवारी २००२ पासून आजपावेतो दर आठवडय़ाला न चुकता हा उपक्रम चालविला जात आहे. हेरंब रहिवासी संघाने येथेच स्वत:च घेतलेल्या दुकानात दर शनिवारी रात्री येथील नागरिक आपल्या आठवडय़ाभराच्या भाजीची यादी आणून देतात. रात्री उशिरा संघाचे रत्नाकर चांदसरकर याची नोंद करून एकत्रित यादी करतात. काही जण व्हॉट्सअ‍ॅपवरही भाजीची यादी पाठवितात. ही यादी घेऊन रविवारी सकाळी पाच वाजता चांदसरकर व त्यांचे सहकारी भाजी आणतात. कल्याण भाजी मंडईतून तब्बल १५० किलोच्या आसपास भाजी विकत घेण्यात येते. भाजी आणण्यासाठी येथील दादा वराडकर यांची रिक्षा वापरली जाते. त्यानंतर खेर विभागातील दशरथ वाळुंज, संजय वैद्य, नंदू राठी आदी जण ही भाजी लावून त्याची यादी वाचतात व हिशोब करतात. येथील रहिवासी वनिता नाईक यांच्या सीतासदन या इमारतीखाली ही भाजी लावण्यात येते. भाजी आणल्यावर नागरिक आपापली भाजी घेण्यासाठी येथे एकत्र जमतात.