जव्हार तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या सात पाडय़ांवरील आदिवासींच्या आयुष्याला तिथे कार्यान्वित होत असलेल्या सौर ऊर्जा केंद्रांद्वारे नवी प्रकाशवाट गवसली आहे. आतापर्यंत डोंगरी-दुर्गम भागात दिव्यांपुरत्या मर्यादित असलेल्या सौर ऊर्जेने आधुनिक जीवनशैलीस आवश्यक असलेल्या सर्व गरजा भागविण्याची सुविधा स्थानिक आदिवासींना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सौर ऊर्जेद्वारे आदिवासींच्या कुडाच्या झोपडीत दिव्याच्या प्रकाशाबरोबरच आता पंखे फिरू लागले आहेत. टी.व्ही. त्यांना बाहेरचे जग दाखवू लागला आहे.
पाडय़ातला ‘सूर्य’!
प्रगती प्रतिष्ठान आणि ग्रामऊर्जा प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी आयसीआय बँकेने १ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून येत्या ३ जून रोजी या प्रकल्पाचे  उद्घाटन होणार आहे. जव्हारपासून ३०-३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या पाडय़ांपर्यंत अद्याप पारंपरिक वीजपुरवठा होऊ शकलेला नाही. प्रगती प्रतिष्ठान, रोटरी तसेच अन्य काही स्वयंसेवी संस्थांनी काही वर्षांपूर्वी सौर दिवे देऊन या पाडय़ांवरील अंधार दूर करण्याचा प्रयत्न केला होता. आता या वीजनिर्मिती प्रकल्पाने त्यांना आधुनिक जगाशी जोडण्याचा प्रयत्न आहे. दारिद्रय़ाचे दुष्टचक्र भेदण्यास या प्रकल्पाची मदत होईल, असा विश्वास प्रगती प्रतिष्ठानच्या सचिव सुनंदा पटवर्धन यांनी व्यक्त केला.
प्रत्येक पाडय़ासाठी स्वतंत्र केंद्र
पाथर्डी, ऐना आणि झाप या तीन ग्रामपंचायतींअंतर्गत येणाऱ्या हेदोली, दखनेपाडा, उंबरपाडा, मनमोहाडी, वडपाडा, भाटीपाडा आणि नवापाडा या सात पाडय़ांमध्ये स्वतंत्र सौर ऊर्जा केंद्रांद्वारे वीजपुरवठा करण्यात आला आहे. या सातही केंद्रांद्वारे एकूण ३८ किलोव्ॉट निर्मिती होते. सर्व पाडे मिळून  लोकसंख्या एक हजाराच्या आसपास आहे. प्रत्येकाच्या घरी रीतसर जोडणी  करून स्वतंत्र मीटरही बसविण्यात आले आहेत. प्रत्येक कुटुंबाला दरमहा किमान  शंभर रुपये वीज बिल भरावे लागणार आहे.