कळव्यातील घटना; आईला मारहाण केल्याचा राग

आईच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करणाऱ्या पित्याची मुलानेच हत्या केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री कळवा पूर्वेतील मफतलाल शांतिनगर झोपडपट्टीत घडली. विष्णू अलझेंडे (२८) असे आरोपी मुलाचे नाव असून त्याने वडिलांबरोबरच काका दत्ता अलझेंडे व आजी पमाबाई अलझेंडे यांच्यावरही हल्ला केला. वडिलांना आईविरुद्ध भडकावत असल्याच्या रागातून विष्णूने काका व आजीवर हल्ला केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपी विष्णू यास अटक केली आहे.

कळवा परिसरात अरुण अलझेंडे पत्नी व चार मुले, आई व भाऊ या परिवारासह राहात होते. मजुरीचे काम करणारे अरुण अलझेंडे सातत्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत. मद्यपान करून ते तिला शिवीगाळ व मारहाणही करत असे. या सततच्या त्रासाला कंटाळून आरोपी विष्णू अलझेंडे आई व भावंडांसह पारसिकनगर येथे भाडय़ाच्या घरात रहवयास गेला होता. तिथेही वडील अरुण अलझेंडे येऊन विष्णूच्या आईला मारहाण करत असत. तसेच फोनवरून शिवीगाळ करण्याचा प्रकारही यादरम्यान सुरू होता. वडील आईला देत असलेल्या त्रासाचा राग मनात धरून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास विष्णू याने कळवा येथील घरी जाऊन लोखंडाच्या सळीने डोक्यात प्रहार करून वडिलांची हत्या केली. तसेच काका व आजी वडिलांना आईबद्दल भडकावून तिला मारहाण व शिवीगाळ करण्यास भाग पाडत असल्याच्या रागातून त्यांना देखील विष्णू याने सळीने मारहाण केली. डोक्यात मार लागल्याने काका व आजी देखील गंभीर जखमी झाली आहे.  विष्णू नंतर पोलिसांना शरण गेला.