मृत व्यक्तीच्या नावे खोटे दाखले आणि खोटय़ा स्वाक्षऱ्या करून कल्याण येथील बारावे गावातील भूखंड परस्पर विकसित करण्यासाठी विकासकाला मदत केल्याच्या आरोपावरून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तीन माजी आयुक्तांसह एकूण १५ जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत चौकशी करण्यास विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. यामध्ये आर. डी. शिंदे, गोविंद राठोड, रामनाथ सोनावणे या माजी आयुक्तांचा समावेश आहे.
कल्याणमधील बारावे गाव येथील देसाईकर कुटुंबीयांच्या मालकीचा भूखंड प्रेमासाई बिल्डर्सचे जयराम निहलानी, प्रकाश पमनानी यांनी विकसित करण्यासाठी घेतला. या संदर्भात करार आणि कुलमुखत्यारपत्रही तयार करण्यात आले. मात्र कोणताही अधिकार नसताना भूखंडमालकाची संमती न घेता निहलानी व पमनानी यांनी परस्पर भूविकास करार व कुलमुखत्यारपत्र तयार करून हा भूखंड साईहोम्सला विकसित करण्यासाठी दिला. विशेष म्हणजे, भूखंडाचे मालक बाळू देसाईकर २००१मध्ये मरण पावले असताना ते २००६मध्ये मरण पावल्याचा दाखल तयार करण्यात आला. याच दाखल्याचा वापर करून वास्तुरचनाकार अनिल निरगुडे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याशिवाय कुलमुखत्यारपत्र तसेच भूविकास करारावर मृत बाळू देसाईकर यांची सही नसतानाही पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या व्यवहाराला आडकाठी आणली नाही, असे बाजारपेठ पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी बी. आर. घाडगे यांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. २००६ ते २०१२ या काळात सुधारित व वाढीव बांधकामांना परवानग्या दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पाश्र्वभूमीवर, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील आर. डी. शिंदे, गोविंद राठोड, रामनाथ सोनावणे या तिघा माजी आयुक्तांसह नगररचना विभागातील तत्कालीन नगररचनाकार रघुवीर शेळके, साहायक नगररचनाकार सुनील पाटील, राजेश मोरे, शिरवाडकर, साहायक संचालक सुनील जोशी, चंद्रप्रकाश सिंग यांच्यासह सहा कनिष्ठ अभियंत्यांविरुद्ध भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई करण्याची परवानगी कल्याणच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाकडे मागण्यात आली होती. त्यास विशेष न्यायालयाचे न्या. एम. जे. मिर्झा यांनी मंजुरी दिली आहे. याप्रकरणी आर. डी. िशदे, सोनावणे तसेच गोिवद राठोड या तिघा माजी आयुक्तांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.

काय आहे प्रकरण?
’कल्याणमधील बारावे गावातील देसाईकर कुटुंबीयांचा भूखंड विकसित करण्यासाठी प्रेमासाई बिल्डर्सच्या निहलानी आणि पमनानी यांनी ताब्यात घेतला होता. हा भूखंड परस्पर ‘साईहोम्स’ला विकसित करण्यासाठी देण्यात आला.
’हे करताना मूळ मालकाच्या मृत्यूचा खोटा दाखला व बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
’हे प्रकरण उजेडात आल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी डॉ. योगेश शिंदे, विश्वास मिरकुटे, शनी देसाईकर आणि रमेश पाटील यांना अटकही केली.
’तर निहलानी तसेच पमनानी, वास्तुरचनाकार नरगुडे यांच्यासह साईहोम्सचे हरदास थारवानी, अनिल थारवानी, सुनील थारवानी या सर्वानी अटकपूर्व जामीन घेऊन अटक टाळली आहे.