भाषा हे अभिव्यक्त होण्याचे एक साधन आहे. भाषा या माध्यमामध्ये ज्ञान-माहितीचे भांडार, विचार-भावना, व्यवहार इत्यादी अनेक गोष्टी आहेत. यामुळेच भाषा आपल्या जीवनाचा अविभाज्य आणि महत्त्वपूर्ण भाग आहे. असे म्हटले जाते की, प्रत्येक १२ कोसांवर भाषा बदलते आणि दर १२ वर्षांनी परिस्थितीनुरूप त्या भाषेत बदल होत जातात. भारतामध्ये साधारणत: हजारहून अधिक बोलीभाषा प्रत्यक्ष वापरात आहेत. वसईमधील स्थानिक लोक दैनंदिन जीवनात १५ ते १६ बोलीभाषांचा वापर करतात.

कादोडी (कुपारी समाजाची बोलीभाषा), वाडवळी, कोकणी, आगरी, कोळी, रानकर कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, वारली (आदिवासी भाषा) इत्यादी वसईमधील प्रमुख बोलीभाषा आहेत. याच भाषा प्रत्येक गावात समाजपरत्वे आपल्याला वेगवेगळ्या ऐकायला मिळतात. भाषा सारखीच पण शब्द वेगळे, उच्चार वेगळे, लय-गती यांत फरक आढळतो. भाषा बदलली म्हणून ती वेगळी आहे, असे गणले जाते, यामुळेच बोलीभाषांच्या संख्येत वाढ झालेली आहे.

epfo adds 1 65 crore net members during the fy 24
‘ईपीएफओ’च्या सदस्यसंख्येत वर्षभरात १.६५ कोटींची भर
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Loksatta explained Due to the continuous increase in mustard production, the discussion of yellow revolution is starting
विश्लेषण: देश पिवळय़ा क्रांतीच्या दिशेने..
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या

पूर्वीच्या काळी दळणवळण, व्यापार हे समुद्रामार्गे होत असे. त्या काळात उत्तर कोकणातील वसई, सोपारा ही महत्त्वाची बंदरे होती. म्हणूनच या भागात विविध प्रांतांतील लोकांची ये-जा होत असे. त्यामुळे या भाषेत गुजराती, मारवाडी, पारसी, इराणी, कानडी, ऊर्दू, अरबी आणि पोर्तुगीज इत्यादी भाषांचा प्रभाव दिसतो. या भाषांतील काही शब्द येथील स्थानिक लोक त्यांच्या बोलीभाषेत सहज वापरतात.

वसईमधील धर्मातरित लोकांनी कधीच आपल्या मूळ भाषेचा त्याग केला नाही. त्यामुळे येथील मूळ ख्रिस्तींची म्हणजेच सामवेदी (कुपारी) समाजाची कादोडी भाषा, सोमवंशी (वाडवळ) समाजाची वाडवळी भाषा, ईस्ट इंडियन (ओळकर/ ओलकर) समाजाची ईस्ट इंडियन भाषा आणि कोळी (इतर मच्छीमार) समाजाची कोळी भाषा आजही त्यांनी टिकवून ठेवली आहे. या ख्रिस्ती समाजांच्या बोलीत पोर्तुगीज आणि लॅटिन शब्दांचा वापर अधिक आहे. नंतरच्या काळात धर्मातरित झालेल्या समाज त्यांची मूळ भाषाच बोलत राहिले. या १०० वर्षांत आदिवासी समाजानेही धर्मातर केले, त्यांनीही त्यांची आदिवासी भाषा टिकवून ठेवली आहे.

मराठीमध्ये आपण इकडे-तिकडे हा शब्द वापरतो त्यासाठी येथील बोलीमधील कादोडी भाषेत अडे-तडे (अडॅ-तडॅ), वाडवळी भाषेत अटे-तटे, ईस्ट इंडियन भाषेत अंवार-तंवार तर कोळी भाषेत अईला-तईला असे म्हणतात. त्याचबरोबर अंयला-तंयला, अंय-तंय, अंयशी-तंयशी, अंथ-तंथ, अय-तय इत्यादी हे शब्ददेखील वसईच्या विविध भागांत वापरले जातात.

या बोलीभाषांतील अनेक म्हणी प्रसिद्ध आहेत. म्हण ही अलंकारिक असल्यामुळे भाषेची शोभा तर वाढवते आणि त्याचबरोबर सूचक अर्थही दर्शविते. कादोडी भाषेमधील, ‘सात दऱ्यो पॉवलॉ; वेहीत येऑन बुडलॉ’ याला मराठीत ‘सात दऱ्या पोहून आला, वेशीत येऊन बुडाला’ असे म्हणतात. याचा अर्थ, मोठय़ा दिव्यातून पार झाला, पण थोडक्यासाठी फसला. वाडवळी भाषेमधील, ‘मायेरशी पेज (कणेर) प्यावी न धनाहारकी हंगावी’ याला मराठीमध्ये ‘माहेरची पेज प्यावी अन् मिष्ठान्न खाल्ल्याचे सांगावे’ असे म्हणता येईल. म्हणजेच याचा अर्थ घरच्या परिस्थितीचे प्रदर्शन न करणे. ईस्ट इंडियन भाषेमधील, ‘बेंडय़ान वय केली न वाऱ्यावर गेली’ यास मराठीमध्ये ‘आंधळ्याने कुंपण केले अन् वाऱ्यावर गेले’ असे म्हणतात. याचाच अर्थ, अमाप कष्ट करून मिळवले, पण निसर्गापत्तीने नष्ट झाले. वारली भाषेमध्ये, ‘आंबा पडल, चिंच झेलल; चिंच पडल, आंबा झेलल’ यास मराठीमध्ये ‘आंबा पडेल, चिंच झेलेल; चिंच पडेल, आंबा झेलेल’ असे म्हणतात. म्हणजेच याचा अर्थ आयुष्याच्या वाटेवर एकमेकांस साहाय्य करणे.

पूर्वी या बोलीभाषांचे लिखित-मुद्रित स्वरूप उपलब्ध नव्हते. कालांतराने चक्र बदलले. ९० च्या दशकापासून येथील स्थानिक लोकांनी पुढाकार घेऊन आपली भाषा टिकवण्यासाठी आणि ती अधिक समृद्ध करण्यासाठी पावले उचलली. आपल्या मातृभाषेत लेखन सुरू केले, विशेषत: कदोडी आणि वाडवळी बोलीभाषेतील लिखित साहित्य आज उपलब्ध आहे. तर कादोडी भाषेचे व्याकरणही बनवले आहे. यात ‘अ’, ‘आ’, ‘इ’, ‘ई’, ‘उ’, ‘ऊ’, ‘एॅ’, ‘अई-आई’, ‘ओ’, ‘ऑ’, ‘अऊ’, ‘अं, ‘अ:’ (ऐ, औ वापरले जात नाहीत) असे १४ स्वर आणि ३२ व्यंजने (मराठीप्रमाणेच सर्व व्यंजने असून च, छ, ण, ष वापरले जात नाहीत.) आहेत.

या बोलीभाषांचा गौरव म्हणजे, २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांपासून शालेय (मराठीच्या पाठय़पुस्तकात) तसेच महाविद्यालयीन (बी.ए., एम.ए.) अभ्यासक्रमात अल्पसंख्याकांचे साहित्य म्हणून वसई-पालघर भागातील वाडवळी, कादोडी, आगरी इत्यादी बोलीभाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. डॉ. सिसिलिया काव्‍‌र्हालो, जॉर्ज लोपीस, रिचर्ड नुनीस, स्टॅन्ली गोन्सालवीस, स्टीफन एम. परेरा, दीपक मच्याडो, रेमंड मच्याडो, धोंडू पेडणेकर, स्मिता पाटील आणि सिरील मिनेजीस या साहित्यिकांचे साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेले आहे. पुढच्या अनेक पिढय़ा या साहित्याचा, या बोलीभाषेचा अभ्यास करणार ही वसईकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे.

या बोलीभाषांसह मराठी भाषाही येथे पूर्वीपासून बोलली जाते. अनेक लोकांचे मराठी साहित्य प्रकाशित झालेले आहे. सर्व बोलीभाषा या मराठी भाषेच्या भगिनी आहेत. वैश्वीकरणानंतरच्या काळात या भागातील लोकदेखील उपजीविकेची भाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्रजीचा वापर मोठय़ा प्रमाणात करू लागले. त्यामुळे इंग्रजी शब्दही या बोलीत आले आहेत.

‘‘बोलीभाषा कधीच मृत पावणार नाही. जोपर्यंत लोक आहेत तोपर्यंत ती राहणार. तिचा वापर मात्र कमी होऊ  शकतो. भाषेचे मूळ साहित्य अबाधित राहून, ती रूपांतरित होत जाते,’’ असे फादर फ्रान्सिस कोरिया सांगतात.