नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागराला नारळ अर्पण करून कोळी बांधव होडय़ा सागरात लोटतात. पावसाळ्यात दोन महिने बंद असलेला मासेमारी व्यवसाय पुन्हा सुरू करतात. त्यामुळे नारळी पौर्णिमेच्या सणाला कोळी समुदायात विशेष महत्त्व असते. मात्र पावसाचे संपूर्ण वेळापत्रकच गेल्या काही वर्षांत बदलू लागल्याने तसेच यावर्षी आलेल्या अधिक महिन्यामुळे नारळी पौर्णिमेचा दिवस लांबणीवर गेल्याने सणापूर्वीच मासेमारीसाठी नौका समुद्रात शिरल्या आहेत. त्यामुळे समुद्राला नारळ अर्पण करून मासेमारीला सुरुवात करण्याचा प्रघात आता केवळ औपचारिकतेपुरता उरला आहे.नारळी पौर्णिमेला कोळी समाजामध्ये अत्यंत मानाचे स्थान असून उपजीविकेचे साधन असलेल्या समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण मानला जातो. पावसाळ्याच्या दिवसांत सोसाटय़ाच्या वाऱ्यांमुळे समुद्र खवळलेला असतो. तसेच हा काळ मत्स्यप्रजननाचाही असतो. खवळलेला समुद्र श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमेनंतर शांत होत असतो. त्यामुळे नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून त्याची मनोभावे पूजा करून मासेमारीच्या होडय़ा दर्यात लोटल्या जातात. या परंपरेमुळे तसेच खराब हवामानामुळे पावसाळ्यातील दोन महिने मासेमारी बंद असते. मात्र पावसाच्या बदलत्या वेळापत्रकामुळे गेल्या काही वर्षांत ही प्रथा कालबाह्य़ होऊ लागली आहे.गेल्या काही वर्षांपासून जून, जुलैपेक्षाही ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. यंदाही आतापर्यंत पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे समुद्रही शांत आहे. परिणामी नारळी पौणर्िेमेपूर्वीच मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात प्रवेश केल्याचे दिसून येते. समुद्र शांत असेल त्याच वेळी कोळी बांधव समुद्रात जाऊन मासेमारी करू लागले आहेत.
पौर्णिमेला मात्र जल्लोष
नारळी पौर्णिमेचे व्यावसायिक महत्त्व कमी झाले असले तरी या उत्सवाचा उत्साह अजिबात ओसरलेला नाही. ठाणे, कळवा, कल्याण, डोंबिवली शहरांतील कोळीवाडय़ांत आजही नारळी पौर्णिमा दणक्यात साजरी केली जाते. ठाणे, कल्याणमध्ये यानिमित्त मोठमोठय़ा शोभायात्राही काढल्या जातात.  कल्याण शिवाजीचौक ते दुर्गाडी किल्ला अशा ठिकाणी शोभायात्रा आयोजित करण्यात येते. गणेशघाटावर पारंपरिक नारळ अर्पण करण्याचा कार्यक्रम पार पडतो. त्यानंतर नारळ फोडण्याच्या स्पर्धेला सुरुवात होते. परिसरातील सुमारे ३० गावांतील कोळी बांधव त्यात उपस्थित राहतात, अशी माहिती महाराष्ट्र कोळी समाज संघाचे राज्य उपाध्यक्ष दीपक भोईर यांनी दिली.