भिवंडीत महिलांच्या वेण्या कोणीतरी अज्ञात व्यक्ती कापत असल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून परिसरात पसरली आहे. आता पुन्हा अशी चौथी घटना घडल्याचा दावा येथिल नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महिलांच्या सांगण्याप्रमाणे पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, भिवंडीतील ज्या भागात या घटना घडल्या आहेत. येथील घरे लहान असल्याने अशा कोणी अज्ञात व्यक्ती घरात शिरून केस कापणे अशक्य असून घरातीलच कोणीतरी या अफवेचा फायदा घेत अशी कृत्ये करीत असावेत अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

उत्तरप्रदेशात गेल्या काही दिवसांपासून अचानक महिलांच्या वेण्या कापल्याच्या घटना घडलेल्या असतानाच भिवंडीतील वेगवेगळ्या ठिकाणी आतापर्यंत चार महिलांचे केस (वेणी) कापल्याच्या खळबळजनक घटनासमोर आल्या आहेत. तसेच या घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पहिली घटना भिवंडीतील ‘निजामपुरा’ दुसरी घटना ‘ठाकऱ्याचा पाडा’ तर आज तिसरी घटना ‘आमपाडा’ या परिसरात घडली आहे.

ज्या महिलेची वेणी कापण्यात आली तीचे नाव सायराबानो सैय्यद (वय ४०) असून ही महिला रात्री घरात झोपलेली असताना अचानक तिला जाग आली त्यावेळी आपले केस कापल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर या महिलेने आरडाओरड करायला सुरवात केली. त्यानंतर ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरली. याआधी सबिना खातून (वय १४) या मुलीसोबत ही घटना घडली होती. गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या बाळांत झालेल्या बहिणीला मदत करण्यासाठी उत्तर प्रदेश राज्यातून ती भिवंडीत आली होती. रात्री उशिरापर्यंत सगळे घरात झोपले असतांना सबिना ही पाणी पिण्यासाठी उठली त्यादरम्यान तिला आपली वेणी कापली गेल्याचे लक्षात आले. भिवंडीच्या कासार आळी येथे देखील अशीच घटना समोर आली होती. येथील नंनद–भावजयच्या वेण्या मध्यरात्रीच्या सुमाराला घरात झोपलेल्या असताना कोणीतरी अज्ञाताने कापल्याचा दावा त्यांनी केला होता.

महिलांच्या डोक्यावरील केस कापण्याची अफवा भिवंडी शहरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा सहाय्यक पोलीस आयुक्त नरेश मेघराजानी यांनी दिला आहे.