कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील वाहतूक सिग्नल असून नसल्यासारखे. गेली १५ वर्षे ते आहे त्याच स्थितीत स्तब्ध उभे आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडले काय नि पाळले काय, हे ठरवणार कोण? वाहतूक विभागाचीही या सिग्नलसारखीच अवस्था झालीय आणि पालिका प्रशासनाने तर अकार्यक्षमतेचे सर्वच ‘सिग्नल’ तोडले आहेत. त्यामुळे कधी तरी पालिका जागी होईल आणि सिग्नल दुरुस्त केले जातील, या अपेक्षेने शहरातील ‘संकल्प प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेतर्फे ‘सिग्नल शोकसभा’ घेण्यात येणार आहे. रविवार, १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता शंकरराव चौक, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेजवळ, कल्याण (प.) येथे ‘मृत सिग्नल’ व्यवस्थेला श्रद्धांजली अर्पण करून शहरवासीयांच्या दु:खाला वाचा फोडली जाणार आहे.

सिग्नल प्रश्नांना पालिका हात घालायला तयार नाही. पालिका नावापुरतीच राहिली की काय, अशी शंका येथील प्रत्येक नागरिकाला येत आहे. उच्च न्यायालयाने कान उपटल्यानंतरही पालिकेला जाग येणार नसेल तर त्यावर दु:ख व्यक्त करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.    –
सचिन कदम, संस्थापक-अध्यक्ष, संकल्प प्रतिष्ठान

* ५५ लाख खर्चून सिग्नल यंत्रणा
* अनधिकृत जाहिरातबाजीसाठी सिग्नलच्या खांबांचा वापर
* सिग्नल यंत्रणेवर तात्काळ उपाय करण्याची वाहतूक पोलिसांची वारंवार मागणी
* रस्त्यांवरील वाहतूक कोंडीत तासन्तास खोळंबून राहण्याबरोबरच अपघाताच्या शक्यता
* आग्रा रोड आणि मुरबाड रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी
श्रीकांत सावंत, कल्याण</strong>