प्रवेशद्वार बंद असल्याने वेगवेगळ्या भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना फटका
अखिल भारतीय प्री-मेडिकल व प्री-डेंटल प्रवेश परीक्षा ‘नीट’साठी परीक्षा केंद्रात उशिरा दाखल झालेल्या अनेक विद्यार्थ्यांवर प्रवेशद्वार बंदीमुळे परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ रविवारी आली. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वाराच्या खालून तसेच अन्य मिळेल त्या मार्गाने परीक्षा केंद्रात दाखल होण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना तेथून बाहेर काढल्याने मुलांना प्रवेश परीक्षेपासून वंचित राहावे लागले. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून ठाण्यात दाखल झालेल्या या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा फटका सहन करावा लागला.
अहमदनगर येथून ठाण्यात परीक्षेला आलेल्या प्रतीक्षा भंगारे या तरुणीला प्रवेशद्वार बंदमुळे परीक्षेपासून वंचित राहावे लागले. तिचा नंबर ठाण्यातील सावरकरनगर येथील ज्ञानोदय विद्यामंदिर येथे आला होता. दहा वाजता परीक्षा सुरू होत असल्याने या परीक्षा केंद्रावर साडेनऊ वाजता विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्यामुळे त्यानंतर आलेल्या या तरुणीला परीक्षा केंद्रात पोहचताच येऊ शकले नाही. त्यामुळे या तरुणीने प्रवेशद्वाराखालून रांगत जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे अहमदनगर येथून धावपळ करत आलेल्या या तरुणीला ‘नीट’ परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली. सुरक्षा रक्षकांनी परीक्षा केंद्राबाहेर काढल्यानंतर या तरुणीला रडू कोसळले. या प्रकारचा फटका अन्य केंद्रांवरही परीक्षार्थीना सहन करावा लागला.
ठाण्यात रविवारी तीन केंद्रांवर अखिल भारतीय प्री-मेडिकल व प्री-डेंटल प्रवेश परीक्षा ‘नीट’चे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये पोखरण रस्ता क्रमांक २ येथील लोकपुरम कॉम्प्लेक्समधील लोकपुरम शाळा, सावरकरनगर येथील ज्ञानोदय विद्यामंदिर आणि कोलशेत येथील केंद्रीय विद्यालय या तीन केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला पोहचण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकापासून लांबचे अंतर असल्याने विद्यार्थ्यांची मोठी दमछाक उडाली. शिवाय रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. तर केंद्रावर पोहचल्यानंतर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रवेशद्वार बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले.

परिवहनकडून विशेष व्यवस्था..
ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सॅटिसच्या बस थांब्यावर ‘नीट’ परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांसाठी विशेष बस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ने-आण करणाऱ्या बसेसची माहिती देण्यासाठी साहाय्यक वाहतूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. तर पवारनगर, वागळे आगार, कोलशेत या तीन बस विद्यार्थ्यांना केंद्राकडे नेण्यासाठी धावत होत्या. परिवहन उपक्रमाकडून अशी व्यवस्था असतानाही अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहचताना मोठा त्रास सहन करावा लागला.