स माजातील काही सजग व्यक्ती समाजाची निकड लक्षात घेऊन आपले कार्य निश्चित करतात. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि ध्येयासक्तीच्या बळावर असाध्य ते साध्य करून दाखवताना शून्यातून आपले कार्य उभे करतात. कष्टकरी समाजातील मुलांचा सर्वागीण विकास शिक्षणाच्या माध्यमातून साध्य करता येईल, हे ओळखून काही कष्टकरी समविचारी एकत्र आले. ही गोष्ट साधारण ७०च्या आसपासची. ठाण्यातील पोखरण रोड नं. १, वर्तकनगर भागात बहुसंख्य वस्ती कामगार, रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि पोलीस कर्मचाऱ्यांची. या समाजातील काही मंडळी साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून जनजागृतीचे सामाजिक कार्य करीत होते. या भागातल्या मुलांना अगदी जवळ अशी शाळा नसल्याने शाळेची निकड या कार्यकर्त्यांना होती. या मुलांसाठी शाळा सुरू करायची आणि त्यांच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे उद्दिष्ट निश्चित झाले. खरे तर हे उद्दिष्ट साध्य करणे सोपे नव्हते, पण या मंडळींच्या तपश्चर्येला फळ आले. ७३ साली या मंडळाची शाळा जी आता श्रीमती सावित्रीदेवी थिराणी विद्यामंदिर म्हणून प्रसिद्ध आहे ती सुरू झाली. म्हाडाच्या ५५ नं. इमारतीमधील दोन खोल्यांत ८वीचे दोन वर्ग सुरू झाले. गांधीनगर, शांतीनगर, चिरागनगर, शास्त्रीनगर, भीमनगर अशा परिसरातल्या कष्टकरांच्या जीवनात या शाळेने आशेचा किरण निर्माण केला. दोन तुकडय़ांनी सुरू झालेल्या शाळेत सध्या ३३ तुकडय़ांमध्ये सतराशेच्या वर विद्यार्थी शिकत आहेत. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याच्या ध्येयाचा आजही शाळेला विसर पडलेला नाही आणि त्यामुळे तीन तपांनंतरही ही व्रतस्थ वाटचाल ध्येयप्रेरित वृत्तीने सुरू आहे हे विशेष!

‘स्वातंत्र्य, समता, बंधुभाव मानणारा पर्यावरणस्नेही कृतिशील, श्रमाचे मोल जाणणारा विद्यार्थी आणि शिक्षक घडवू, असे या शाळेचे ब्रीदवाक्य आहे. त्याला अनुसरून अनेकविध कल्पक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्यास प्राधान्य दिले जाते. या शाळेने कापडी पिशव्या वापराविषयी जनजागृती करण्याचे जणू कंकण बांधले आहे. या उपक्रमाअंतर्गत गेली ६ ते ७ वर्षे शाळा कापडी पिशव्या तयार करणे, त्यांच्या वापराविषयी जनजागृती करणे आणि विक्री करणे अशी तीन स्तरांवर काम करीत आहे. शाळेतील ५ ते ६ विद्यार्थी आणि सतरा महिला पालक स्वत: या पिशव्या शिवतात आणि विद्यार्थी विक्रीही करतात. एका साडीत साधारणपणे २० पिशव्या होतात. या कामासाठी सर्वाना मोबदला दिला जातो. शाळेजवळील मंदिराच्या उत्सवप्रसंगी, भाजी आणि फळ विक्रेते, आठवडी बाजारातील भाजी विक्रेते अशा ठिकाणी विद्यार्थी स्वत: जाऊन कापडी पिशव्यांचा वापर करण्याविषयी आणि प्लॅस्टिकचा वापर टाळण्याविषयी संवाद साधतात, जागृती करतात. राष्ट्रीय हरितसेनाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येतो. शाळेच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाची दखल महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण कार्यालयातर्फे घेण्यात आली. आणि शाळेला खास पंचतारांकित दर्जा देण्यात आला आहे. ठाणे शहर आणि ग्रामीण विभाग, मुंबई विभाग यामधील २५० शाळांमधून ही निवड करण्यात आली हे विशेषत्वाने नमूद करण्याजोगे! शाळेच्या पर्यावरण मंडळातर्फेदेखील अनेकविध उपक्रम राबवले जातात. या शाळेत लहान-मोठी मिळून ३५० च्या वर झाडे आहेत. खास औषधी वनस्पतींच्या छोटय़ाशा बागेत कोरफड, अडुळसा, निरगुडी, वेल अशा वनस्पती पाहावयास मिळतात. दिवाळीनंतर या झाडांच्या पालापाचोळ्यापासून शाळेतच सेंद्रिय खत तयार केले जाते.
या शाळेत येणारा बहुतांश विद्यार्थी हा आर्थिकदृष्टय़ा दुर्बल स्तरातील असल्याने घरी बऱ्याचदा शैक्षणिक वातावरणाचा, अभ्यासास पोषक वातावरणाचा, पालकांच्या मार्गदर्शनाचा अभाव असतो. तरीही गेली ३ वर्षे शाळेचा दहावीचा १०० टक्के निकाल लागतो आणि त्यासाठी यशाचा थिराणी पॅटर्न जाणून घ्यायला हवा. इ. ९ वीमधील लेखी परीक्षेत कमी गुणप्राप्त विद्यार्थ्यांना इ. १० वीमध्ये अतिरिक्त मार्गदर्शन दिले जाते. रोज शाळा सुटल्यावर १२.३० ते १.३० मध्ये जादा तास आणि दर शनिवारी साप्ताहिक परीक्षा. त्याचाही सातत्याने पाठपुरावा घेतला जातो. जो विषय कच्चा वाटतो तो पुन:पुन्हा येईपर्यंत करवून घेतला जातो. शाळा आणि शिक्षक यांच्या या थिराणी फॉम्र्युलाला गेली ३ वर्षे उत्तम यश प्राप्त झाले आहे. एका हुशार विद्यार्थ्यांकडे कच्च्या विद्यार्थ्यांची जबाबदारी दिली जाते. हा विद्यार्थी त्याच्याकडून त्याला अडणारे प्रश्न, गणिते समजावून सांगतो आणि सराव करवून घेतो. ही पद्धत यशस्वीपणे राबविली जात आहे.