इमारत धोकादायक ठरल्यानंतर महिनाभर शाळा बंद

कोलशेत येथील केंद्रीय शाळा गेल्या महिन्याभरापासून बंद असल्याने विद्यार्थ्यांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. ऑगस्टपासूनच शाळेला कुलूप असल्याने या शाळेत शिकणारे पहिली ते सहावी इयत्तेतील विद्यार्थी अभ्यासापासून वंचित आहेत. याच शाळेत अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षण देण्यात येत असल्याने सध्या महाविद्यालयाचे विद्यार्थी शाळेच्या आवारातील छताखाली अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. विद्यार्थ्यांसाठी शाळा- महाविद्यालय लवकरच खुले करणार असणार असल्याची माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आली असली तरी शाळा सुरू होण्याची निश्चित तारीख दिली जात नसल्याचे विद्यार्थी-पालक संभ्रमावस्थेत आहेत.

कोलशेत येथील केंद्रीय महाविद्यालयात पहिली ते १२वीपर्यंत एकूण १४०० विद्यार्थी शिकत आहेत. महिन्याभरापूर्वी ही शाळा धोकादायक असल्याचे मिलिट्री इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिसेसने सांगितले होते. यानंतर नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या आवारातील छताखाली वर्ग घेण्यात येत होते.

तसेच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना भांडूप येथील शाळेत पाठविण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला होता. मात्र, पालकांनी केलेल्या तीव्र विरोधानंतर काही काळ हा निर्णय स्थगित ठेवण्यात आला होता. त्यामुळे प्रशासनाने महिन्याभरापासून शाळेला कुलूप ठोकले होते. मात्र, गेल्या आठवडय़ात पालकांशी झालेल्या बैठकीनंतर सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग शाळेच्या मैदानात सुरू आहेत. पहिली ते सहावीची शाळा केव्हा सुरू होणार याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती पालकांना देण्यात आलेली नाही.

शाळेकडून विविध ठिकाणी चाचपणी सुरू असून नौदलाची जागा शाळेसाठी मिळत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. महिन्याभरापासून पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांची शाळाच सुरू झालेली नाही. त्यामुळे परीक्षा जवळ आली असतानाच आता शिक्षणाचा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित राहत आहे.

आम्हाला केंद्रीय शाळेच्या विद्यार्थ्यांची काळजी आहे. त्यामुळे लवरकच यासंबधी निर्णय होईल.

–  अरुणा भल्ला, उपायुक्त, केंद्रीय महाविद्यालय, मुंबई विभाग

गेल्या महिन्याभरापासून शाळा बंद असली तरी आम्ही हळूहळू शाळा सुरू करत आहोत. शाळेच्या मैदानात छत आहेत. त्यात आम्ही मुलांचे वर्ग सुरू केले आहेत. पहिली ते सहावीचे वर्गही लवकरात लवकर सुरू करण्यात येतील.

– चंद्रशेखर सिंग, मुख्याध्यापक