वनविभागाने लोकाभिमुख योजना राबविण्‍याची आवश्‍यकता असून गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही १ जुलै ते  ७ जुलै दरम्‍यान ४ कोटी वृक्ष लागवड करण्‍याचा संकल्‍प आपण लोकसहभागातून पूर्ण करू  असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ते कालपासून सुरू झालेल्या ७ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या परिषदेचे उद्घाटन करतांना बोलत होते. उत्‍तन येथील रामभाऊ म्‍हाळगी प्रबोधनीत ही परिषद सुरू असून आज दुसऱ्या दिवशी या परिषदेत वाईल्ड लाईफ ( वन्य जीवन) संबंधित विविध विषय तसेच विशेषत: मॅन्ग्रोव्हज संवर्धनावर भर देण्याचे ठरले. यासंदर्भात एका महत्वाकांक्षी आराखड्याचे सादरीकरणही करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ३ कोटी वृक्ष वनविभागाच्‍या माध्‍यमातून तर १ कोटी वृक्ष अन्‍य विभागांमार्फत लावण्याचे नियोजन आहे. यामध्ये जास्तीतजास्त लोकसहभाग मिळवून गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील ही मोहीम यशस्वी करावी.

यावेळी वनविभागाचे सचिव विकास खारगे यांनी देखील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रधान मुख्‍य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख आणि वरिष्‍ठ वनाधिका-यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. यंदाच्या अर्थसंकल्‍पात वनक्षेत्रात राहणा-या नागरिकांसाठी शंभर टक्‍के एलपीजी गॅस देण्‍यासाठी २५ कोटी रूपयांची तरतूद करण्‍यात आली आहे. चेन लिंक फेंसींगसाठी आर्थिक तरतूद करण्‍यात आली आहे.  विविध माध्‍यमातून मानव वन्‍यजीव संघर्ष कसा कमी करता येईल, यादृष्‍टीने आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत असे मुनगंटीवार यांनी म्हटले.

वन शहीदांची संख्‍या कशा कमी करता येईल याचाही विचार होणे गरजेचे आहे. प्रामुख्‍याने ग्रीन आर्मी वृक्षारोपणाची मोहीम यासारख्‍या योजनांवर आगामी काळात भर दिला जाईल तसेच शासनाच्‍या सर्व पडीक जमीनीवर वनीकरण करण्‍यासंदर्भात वनाधिका-यांनी पुढाकार घ्‍यावा, अशी सुचनाही वनमंत्र्यांनी यावेळी बोलताना केली. राज्‍यातील रेल्‍वे मार्गांलगत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्‍यासंदर्भात कालच वनविभाग आणि रेल्‍वे विभाग यांच्यात सामंजस्‍य करार करण्यात आला होता.