रायगड जिल्ह्यातील कोंढाणा धरण गैरव्यवहार प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी ठाणे न्यायालयात तीन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. परंतु, लाचलुचपत विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांचे नाव नमूद करण्यात आलेले नाही. कोंढाणे प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरणी ठाणे लाचलुचपत विभागाने एफ. ए. कन्स्ट्रक्शनचे निसार खत्री, कोकण पाटबंधारे विकास विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक देवेंद्र शिर्के, तत्कालीन मुख्य अभियंता बी. बी. पाटील, तत्कालीन मुख्य अभियंता पी. बी. सोनावणे, तत्कालीन अधीक्षक आर. डी शिंदे, तत्कालीन कार्यकारी अभियंता ए. पी. काळुखे, तत्कालीन कार्यकारी अभियंता राजेश रिठे यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आला आहे.

या प्रकल्पातील गैरव्यवहारांबद्दल ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात ३ सप्टेंबर २०१६ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास सी. आर. पी. १७३(८) प्रमाणे सुरु आहे. या घोटाळ्यात सरकारचे १०० कोटीं रुपयाहून अधिक नुकसान झाले आहे.  कोंढाणे धरण घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सत्र न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचे नाव असून, लवकरच त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. बोगस निविदाकार उभे करून ८० कोटींचे काम फुगवून ६१४ कोटीं रुपयांपर्यंत नेऊन भ्रष्टाचार करण्याचा प्रकार कर्जत तालुक्यातील कोंढाणा प्रकल्पाबाबत घडला आहे. राज्यातच नव्हे तर पूर्ण देशात गाजलेल्या ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी फडणवीस सरकारने दोन वर्षांपूर्वी सुरू केली होती. या प्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले होते. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने माजी मंत्री अजित पवार व सुनील तटकरे यांची चौकशी केली होती. पण पुढे प्रकरण थंड झाले होते. आता या प्रकरणालाही वेग येण्याची शक्यता आहे.